पुणे : ऑनलाइन गेमच्या नादात कोथरूड भागातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी ३९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका ३० वर्षीय तरुणाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण कुटुंबीयांसह कोथरूड भागात राहायला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याला एका ऑनलाइन गेम विषयक संदेश पाठविण्यात आला होता. त्यानंतर त्याने संदेश वाचून ऑनलाइन गेम डाऊनलोड केला. त्याने नावनोंदणी केली. सुरुवातीला गेम खेळताना दहा हजार रुपये गुंतविले. पहिल्यांदा गेम खेळताना तो दहा हजार रुपये हरला. त्यानंतर त्याने पुन्हा दहा हजार रुपये गुंतविले. टप्याटप्याने त्याने जवळपास पावणेसहा लाख रुपये गुंतविले. गेम खेळताना त्याला एक लाख रुपयांचा नफा झाला. पैसे मिळाल्यानंतर त्याने आणखी पैसे गुंतविले. गेल्या पाच ते सहा महिन्यांत त्याने ३९ लाख ७७ हजार रुपये गुंतविले. ऑनलाइन गेमच्या नादात त्याने मोठी रक्कम गमावली. त्यानंतर त्याने नुकतीच कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

झटपट पैसे कमाविण्याचा नाद

तरुणाने डाऊनलोड केलेल्या ऑनलाइन गेममध्ये विमान हवेत उड्डाण करते. जेवढ्या वेळ विमान हवेत उड्डाण करेल. तेवढे गुण (बेटिंग पाॅईंट्स) जास्त मिळतात. अनेक तरुण झटपट पैसे कमाविण्याच्या नादात या गेमच्या जाळ्यात सापडले आहेत. संबंधित गेमची जाहिरात एका क्रिकेटपटूने केली आहे. त्यामुळे तरुण या गेमकडे आकर्षित झाले आहेत. अशा प्रकारच्या ऑनलाइन गेमच्या जाळ्यात सापडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.