पुण्यातील सिग्नलला पैसे मागणाऱ्या भिक्षेकरी मुलांची महिन्याची उलाढाल ही ४ कोटींच्या घरात पोहोचली असून एक मुल महिन्याला ७ ते ८ हजार रुपये कमावते, असा निष्कर्ष मैत्रेयी फाऊंडेशन आणि संपर्क या दोन संस्थानी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. मैत्रेयी फाऊंडेशन आणि संपर्क या दोन संस्थांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाच्या प्रथम वर्षांच्या ४० विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा पुण्यातील भिक्षेकरी मुलांचा अभ्यास केला. या मुलांची १७ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीमध्ये पाहणी करण्यात आली. या संस्थांच्या पाहणीतून आलेल्या निष्कर्षांनुसार पुणे शहरातील ४८ वेगवेगळ्या चौकांमध्ये ४८२ भिक्षेकरी मुले आहेत. या मुलांची भिक्षेतून मिळणाऱ्या पैशांची उलाढाल ही महिन्याला ४ कोटी ४ लाख ८८ हजार रुपये होते. यातील प्रत्येक मूल हे महिन्याला ७ ते ८ हजार रुपये तर दिवसाला किमान ३०० रुपये कमावते. ४८२ मुलांपैकी ३८५ मुले ही महाराष्ट्रातील, तर इतर मुले ही बिहार व राजस्थानमधून आलेली आहेत. यातील ९ टक्के मुलांनी शाळा पाहिलेलीच नाही. भिक्षेकरी मुलांपैकी ३ ते १४ वर्षे वयोगटातील ४५ टक्के मुले आणि ५५ टक्के मुली आहेत. ६ ते ९ वर्षे वयोगटामध्ये ५७ टक्के विद्यार्थी आहेत. मात्र, १५ ते १८ वर्षे वयोगटातील एकही भिक्षेकरी मूल या पाहणीमध्ये आढळून आलेले नाही. लहान असताना भिक मागणारी ही मुले मोठी झाल्यावर रद्दी गोळा करणे, भंगार गोळा करणे अशी कामे करत असल्याचे आढळले आहे. सिग्नलवरील भिक्षेकरी मुलांसाठी मैत्रेयी फाऊंडेशन आणि संपर्क या दोन्ही संस्थांतर्फे ‘छोटा नागरिक’ प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या मुलांच्या शिक्षणासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन या संस्थांनी केले आहे.
सिग्नलला पैसे मागणाऱ्या मुलांची महिन्याची उलाढाल ४ कोटींवर
मैत्रेयी फाऊंडेशन आणि संपर्क या दोन संस्थांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाच्या प्रथम वर्षांच्या ४० विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा पुण्यातील भिक्षेकरी मुलांचा अभ्यास केला.

First published on: 21-11-2013 at 02:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 cr monthly turnover of beggar on road signal