जागतिक महिलादिनानिमित्त ‘आनंदवन बहुद्देशिय संस्था’ आणि ‘आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रा’ तर्फे चार प्रतिभावंत महिलांचा ‘समाज गौरव’ पुरस्काराने बुधवारी गौरव करण्यात आला.
 ‘गौरव प्रतिभेचा’ या कार्यक्रमामध्ये हे पुरस्कार भीमथडी जत्रेच्या संयोजक सुनंदा पवार आणि भगिनी हेल्पलाईनच्या अॅड. सुप्रिया कोठारी यांच्या हस्ते देण्यात आले. धनश्री तोडकर, शोभना पवार, हर्षदा दगडे आणि दिव्या देशपांडे या चारजणींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत प्रेरणादायी काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. या चौघींबरोबरच डॉ. गणेश राख यांनाही हा पुरस्कार देण्यात आला.
कोल्हापूरच्या धनश्री हिच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसतानाही अडचणींवर मात करत ती सी.ए. झाली आहे. शोभना पवार यांनी पतीच्या निधनानंतर खचून न जाता उदनिर्वाहासाठी स्कूल व्हॅन चालवण्यास सुरुवात केली. आता त्यांच्या स्वतच्या तीन गाडय़ा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका असलेली हर्षदा दगडे आता फौजदार आहे. दिव्या देशपांडे हिने टेबल टेनिसमध्ये भारताचे नाव जागतिक पातळीवर पोचवले आहे. डॉ. गणेश राख यांच्या रुग्णालयात मुलगी जन्माला आली तर त्या रुग्णाला कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. यांच्या या विशेष कामगिरीमुळेच हा पुरस्कार देण्यात आला.