पिंपरी-चिंचवडमधील टाटा मोटर्समध्ये मुलींना कामाला लावतो असे सांगून जवळजवळ चार लाखांची फसवणूक केल्याची घटना पुण्यामध्ये समोर आलीय. खोटं जॉइनिंग लेटर व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवल्यानं आपण या आमिषाला बळी पडल्याचं तक्रारदाराने म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समोर आलेल्या माहितीनुसार ३८ वर्षीय विजय तांबे यांनी या प्रकरणामध्ये भोसरी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केलीय. फारुख अहमद अली लासकर या ४० वर्षीय इसमाने आपली तीन लाख ९५ हजारांची आर्थिक फसवणूक केल्याचं तांबे यांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

करोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यातच, पैसे घेऊन नोकरी लावतो म्हणून अनेकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये विजय तांबे त्यांचा मित्र सुनील बगाडे यांच्या मुलींना टाटा मोटर्स कंपनीत कामाला लावतो असा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ऑनलाइन आणि रोख असे एकूण तीन लाख ९५ हजारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

आरोपी फारुखने व्हाट्सअपवर टाटा मोटर्स कंपनीचे बनावट ज्वाइनिंग लेटर आणि दस्तावेज पाठवले तेव्हा आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं फिर्यादीला समजलं. या प्रकरणी त्यांनी भोसरी पोलिसात तक्रार दिली आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 lakh fraud in name of job in tata factory kjp scsg