आभासी चलनात (क्रिप्टो करन्सी) गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची १३ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बिलग्रंटसिंह साही याच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – पुणे : विद्यापीठ उड्डाणपूल उभारणीतील अडसर दूर
याबाबत प्रवीण नानासाहेब रसाळ (वय ३०, रा. गुरु माऊली हाईट्स, नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे. साही याने समाजमाध्यमात एक समूह तयार केला होता. या समुहात त्याने अनेकांना समाविष्ट करून घेतले होते. रसाळ या समुहात सहभागी झाले होते. साही याने आभासी चलनात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले हाेते. रसाळ यांनी साही याला ऑनलाइन पद्धतीने वेळोवेळी १३ लाख ७६ हजार रुपये दिले. रसाळ यांना कोणताही परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.