जहाँगीर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नावावर केंद्र शासनाच्या हेल्थ स्कीमचे आलेले चार लाख पंधरा हजार रुपये परस्पर हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हॉस्पिटलच्या दोन कर्मचाऱ्यांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे.
अमित अशोक मेटे (वय २९, रा. श्रमिकनगर, धानोरी रस्ता) आणि अश्विनी प्रवीण होले (वय २९, रा. गोपाळवाडी, ता. दौंड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी इंदिरा अशोक बहापुरी (वय २१, रा. विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.  मे २०१२ ते एप्रिल २०१३ दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या हद्दीतील दारिद्रय रेषेखाली कर्मचाऱ्यांना उपचारांसाठी केंद्र शासनाच्या आरोग्य स्कीमच्या अंतर्गत शासनाकडून खर्च मिळतो. या स्कीममध्ये रुग्णाच्या नावावर चार लाख पंधरा हजार रुपये आले होते. आरोपी मेटे हा हॉस्पिटलमध्ये बिलिंग करण्याचे तर होले ही रोखपाल म्हणून काम पाहते. या दोघांनी संगनमताने लॉगिन आयडीचा वापर करून ते पैसे परस्पर काढून घेतले. ही गोष्ट हॉस्पिटलच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या दोघांच्या विरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. किती रुग्णांच्या नावावर आलेले पैसे त्यांनी काढून घेतले याचा शोध सुरू आहे.
या दोघांना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. गुन्ह्य़ात वापरलेली हार्ड डिस्क जप्त करायची आहे. त्यांनी अपहार करून घेतलेले पैसे जप्त करायचे आहेत. त्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तो मान्य करून न्यायालयाने त्यांना ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.