चिखली जाधववाडी येथील पंतनगरमध्ये बोगस नोंदणी केल्याप्रकरणी पिंपरी महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांवर कारवाईची संक्रात आली असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासमोर ठेवला आहे. रहाटणीतील अन्य प्रकरणात अनधिकृत बांधकामांवर अपेक्षित कारवाई न केल्याने तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
चिखलीत अनधिकृत इमारतीची बोगस नोंदणी केल्याचा ठपका ठेवून प्रशासन अधिकारी बाळासाहेब सुतार, सहायक मंडलाधिकारी राजेश माडे, उपलेखापाल विलास कारवे व लिपिक लक्ष्मण काळे यांच्यावर कारवाई निश्चित करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासन विभागाने आयुक्तांसमोर ठेवला असून त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहेत. रहाटणीतील गोडांबे कॉर्नर येथे पाच मजली इमारतीची नोंद करण्यात आली. मात्र, तेथे चौथ्या मजल्याचे काम सुरू असल्याचे आढळून आले. फोटो पंचनामा होऊन, नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र पुढील पाडापाडी कारवाई झाली नाही. यामागे नेमके कारण काय, याचा उलगडा झाला नाही. या प्रकरणी कार्यकारी अभियंता गुलाब दांगट, इफ्तिकार सय्यद, कनिष्ठ अभियंता दिलीप सोनवणे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांचे म्हणणे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावरील कारवाईचे स्वरूप निश्चित केले जाणार आहे.