सेवा सहयोग संस्थेचा उपक्रम
शालेय वर्ष सुरू झाले की सर्वच विद्यार्थ्यांना वेध लागतात ते नव्या दप्तराचे, नव्या शालेय साहित्याचे, नव्या गणवेशाचे. मात्र ग्रामीण आणि दुर्गम भागातील हजारो विद्यार्थी नव्या शालेय साहित्याचा हा आनंद घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना दरवर्षी नवे शालेय साहित्य देण्याचा आगळा उपक्रम ‘सेवा सहयोग’ संस्थेतर्फे चालवला जात असून यंदा या उपक्रमांतर्गत ४० हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी होणार आहे.
पुण्यात आयटी उद्योगांमध्ये काम करणाऱ्या तरुणांनी ‘सेवा सहयोग’ नावाची एक संस्था स्थापन केली आहे. केवळ नोकरी-व्यवसाय न करता समाजासाठीही काही तरी काम करू असा त्यांचा उद्देश ही संस्था स्थापन करण्यामागे होता. ग्रामीण भागात काम करणाऱ्या काही संस्थांचे काम पाहण्यासाठी ‘सेवा सहयोग’चे कार्यकर्ते काही वर्षांपूर्वी गेले होते. ग्रामीण शाळांमधील विद्यार्थी आणि एकूण शाळांची अवस्था पाहून या सर्वाना हे जाणवले, की आपण या ग्रामीण शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी काही तरी केले पाहिजे. शाळांमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण देता आले नाही तरी निदान या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असे काही तरी करूया, असा विचार सर्वानी केला आणि त्यातून ‘स्कूल किट’ या उपक्रमाचा जन्म झाला.
या उपक्रमात यंदा ‘सेवा सहयोग’च्या माध्यमातून ४० हजार स्कूल किट तयार करण्यात येणार आहेत आणि ती महाराष्ट्रातील अनेक खेडय़ांमध्ये तसेच, गोवा, कर्नाटक आदी राज्यातील अगदी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार आहेत. एका स्कूल किटसाठी ४०० रुपये खर्च यंदा आला आणि आयटीमधील तरुणांनी दिलेल्या उत्स्फूर्त आर्थिक सहयोगातून ही रक्कम उभी राहणार आहे. गेली दहा वर्षे हा उपक्रम सुरू आहे आणि दरवर्षीचा ‘स्कूल किट’ वितरणाचा आकडा वाढत असल्याची माहिती ‘सेवा सहयोग’च्या सीएसआर विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक अमित सबनीस यांनी शनिवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितली. या उपक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे या किटसाठी लागणारा सर्व खर्च ‘सेवा सहयोग’मार्फत उभा केला जातो आणि त्यासाठी आयटी कंपन्यांमधील युवक, युवती भरभरून मदत करतात. अनेक कंपन्याही या उपक्रमाला भरीव मदत करतात.
उत्तम दर्जाचे टिकाऊ दप्तर किंवा हॅवरसॅक, वह्य़ा, कंपास, पेन्सिल्स, रंगपेटय़ा, चित्रकलेच्या वह्य़ा, फुलस्केप वह्य़ा, शब्दकोष, अवांतर वाचनाची पुस्तके, गोष्टींची पुस्तके वगैरे सर्व प्रकारचे शालेय साहित्य दप्तरात भरून शाळेच्या पहिल्या दिवशी हे दप्तर विद्यार्थ्यांच्या हाती सोपवले जाते. विद्यार्थ्यांच्या इयत्तांचा विचार करून हे साहित्य दिले जाते. हे स्कूल किट तयार करण्याचे काम यंदा १ मे रोजी सुरू झाले. ते दर शनिवार आणि रविवारी पुण्यात चालते. प्रत्येक दिवशी अडीचशे ते तीनशे जण स्वयंसेवक म्हणून सहभागी होतात. या कामात आयटी कंपन्यांमधील युवक, युवती आणि आणि अन्य मंडळी स्वयंस्फूर्तीने भाग घेतात. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी ‘सेवा सहयोग’चे अनेक कार्यकर्ते गावोगावी जातात आणि विद्यार्थ्यांना या किटचे वाटप करतात. अनेक स्वयंसेवी संस्थांनाही किट दिली जातात. एका छोटय़ा जाणिवेतून दहा वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू झाला. पहिल्या वर्षी पाचशे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला होता आणि या उपक्रमाची व्याप्ती वाढत वाढत यंदा ४० हजार विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे.