लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : आगामी गणेशोत्सवासाठी महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विसर्जन व्यवस्था, मूर्तीसंकलन केंद्र, विसर्जन ठिकाणी जीवरक्षकांची नियुक्ती, स्वच्छतागृहांची उपलब्धता आदींबाबत महापालिका प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या कालावधीत ४०० फिरती स्वच्छतागृहे आणि १५० फिरत्या हौदांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उत्सवाच्या कालावधीत शहराच्या विविध भागांत ४०० फिरत्या स्वच्छतागृहांची सुविधा देण्याचे नियोजित आहे. तसेच शहरातील १ हजार १८३ सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती टॉयलेटसेवा ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. टॉयलेट सेवा ॲपमध्ये पत्ता टाकून त्या भागातील स्वच्छतागृहे शोधता येणार आहेत. तसेच सशुल्क सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये क्यू-आर कोडची सुविधाही देण्यात येणार आहे.
आणखी वाचा-पुणे: जांभुळवाडीत पीएमपी चालकाचा खून
यंदा विसर्जनासाठी ४२ बांधीव हौद, २६५ ठिकाणी ५६८ लोखंडी टाक्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत २५२ ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्र आणि दान केंद्र उभारण्यास सुरुवात झाली आहे. कृत्रिम हौद, लोखंडी टाक्यांच्या ठिकाणी २५६ निर्माल्य कलशांची व्यवस्था केली जाणार आहे.
सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत संकलित केलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन वाघोली येथील खाणीमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन पाळ्यांमध्ये आवश्यक सेवक आणि पर्यवेक्षीय अधिकारी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नेमण्यात आले आहेत. उत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी रस्ते, मोकळ्या जागा, कचरा टाकण्याच्या जागा, नदीपात्र, नदीघाट, विसर्जन हौदांची ठिकाणे, सार्वजनिक गणेश मंडळांचे परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. वाघोली येथील खाणीच्या ठिकाणी जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून क्षेत्रीय कार्यालयाच्या मागणीनुसार गाड्यांची उपलब्धता मोटार वाहन विभागाकडून केली जाणार आहे.
आणखी वाचा-पुण्यात मनसे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; उमेदवाराची चाचपणी सुरू
मुठा नदी पात्रालगत असणाऱ्या विसर्जन घाटांवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमन दलाकडील प्रत्येकी एक फायरमन दुपारी एक ते रात्री नऊ या वेळेत आणि प्रत्येकी दोन जीवरक्षक तीन पाळ्यांमध्ये नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या नियंत्रणासाठी घाटांवर अग्निशमन अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
आपत्कालीन संपर्क क्रमांक
०२०-२५५-१२६९
०२०-२५५०६८०० (१/२/३/४)
गणेश सोनुने आपत्ती व्यवस्थापन अधिकारी- ९६८९९३१५११
देवेंद्र पोटफोडे अग्निशमन प्रमुख- ८१०८०७७७७९, ०२०-२६४५१७०७
अग्निशमन दल- १०१