पुणे : जगातील एकूण क्षयरुग्णांपैकी २५ टक्के भारतात आढळतात, तर देशातील १० टक्के क्षयरुग्ण महाराष्ट्रात आढळून येतात. त्यामुळे १०० दिवसांत राज्यातील क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली होती. त्यात ४० हजारांहून अधिक क्षयरुग्णांचा शोध घेण्यात यश आले आहे.

क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून, याचा प्रसार श्वसनाद्वारे होतो. राज्यात गेल्या वर्षी ३५ लाख ३९ हजार ९४१ संशयित रुग्णांची तपासणी केली. त्यात २ लाख ३० हजार ३१५ जणांचे क्षयरोगाचे निदान झाले. केंद्रीय क्षयरोग विभागाने चालू वर्षासाठी राज्याला २ लाख ३० हजार क्षयरुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. राज्यात यंदा जानेवारी व फेब्रुवारीमध्ये ७ लाख ५४ हजार ६११ जणांची तपासणी केली. त्यात ३९ हजार ७०५ जणांचे क्षयरोगाचे निदान झाले, अशी माहिती राज्याच्या क्षयरोग विभागाचे सहसंचालक डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

क्षयरोगाबाबत जनजागृतीसाठी करण्यासाठी जागतिक क्षयरोग दिन २४ मार्चला साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने १०० दिवस क्षयरुग्ण शोध मोहीम राबविली. या मोहिमेत ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ पर्यंत राज्यात क्षयरोगाचे रुग्ण जास्त आढळून येत असलेले १७ जिल्हे आणि १३ महापालिकांमध्ये तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान ४० हजार ४७१ क्षयरुग्णांचा शोध घेण्यात आला. संशयित क्षयरुग्णांचे निदान करून त्यांच्यावर तातडीने उपचार करून क्षयरोगाची साखळी खंडित करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून सुरू आहे. यासाठी ८० डिजिटल हँड हेल्ड एक्स-रे यंत्रे जिल्ह्यांना वितरित करण्यात आली आहेत, असे डॉ. सांगळे यांनी स्पष्ट केले.

क्षयमुक्त भारताचे उद्दिष्ट दूरच?

जागतिक स्तरावरील शाश्वत विकास ध्येयानुसार २०३० अखेरपर्यंत क्षयरोग दूर करणे अपेक्षित आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे उद्दिष्ट अलीकडे आणून २०२५ अखेरपर्यंत क्षयमुक्त भारताचे लक्ष्य ठेवले. हे लक्ष्य गाठणे अवघड असल्याचे ताज्या आकडेवारीतून समोर आले आहे. देशात क्षयरुग्णांची शोध मोहीम वेगाने सुरू असली, तरी रुग्ण आढळण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे क्षयरुग्णांवर उपचार करून प्रसाराची साखळी खंडित करणे आणि क्षयमुक्त भारताचे उद्दिष्ट गाठणे, या वर्षाच्या अखेरपर्यंत शक्य नसल्याचे चित्र आहे.

राज्यातील क्षयाचा प्रसार

वर्ष – संशयित रुग्ण – निदान झालेले रुग्ण

२०२२ – १९ लाख ९८ हजार ३५६ – २ लाख ३३ हजार ८७२
२०२३ – २६ लाख २२ हजार ६४६ – २ लाख २३ हजार ४४४
२०२४ – ३५ लाख ३९ हजार ९४१ – २ लाख ३० हजार ५१५
२०२५ (फेब्रुवारीअखेपर्यंत) – ७ लाख ५४ हजार ६११ – ३९ हजार ७०५