पुणे : गर्दीच्या ठिकाणांहून गहाळ झालेले, तसेच चोरीला गेलेल्या ४१ मोबाइल संचांचा शोध पर्वती आणि सिंहगड रस्ता पोलिसांनी घेतला. तांत्रिक तपासात गहाळ झालेले मोबाइल संच वापरणाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना मोबाइल परत करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. दिवाळीच्या मुहूर्तावर नुकतेच ४१ मोबाइल संच तक्रारदारांना परत करण्यात आले.

हेही वाचा >>> शहरबात : विद्यापीठ प्राधान्यक्रम कधी ठरवणार?

सिंहगड रस्ता परिसरातून गहाळ झालेल्या २३ माेबाइल संचांचा शोध पोलिसांनी घेतला. तांत्रिक विश्लेषणात मोबाइल राज्याच्या वेगवेगळ्या भागात गहाळ झालेल्या मोबाइल संचांचा वापर करणाऱ्यांचा सिंहगड रस्ता पोलिसांनी शोध घेतला. २३ माेबाइल संच नुकतेच तक्रारदारांना परत करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, गु्न्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक निरीक्षक वैशाली भोसले, उत्तम तारु, हनुमंत गंभीरे, मयूर शिंदे, अक्षय जाधव यांनी ही कामगिरी केली.

हेही वाचा >>> गुन्हेगारी, अतिक्रमणे, अनारोग्य आणि प्रदूषण; वाचा कोणत्या मतदारसंघात आहेत ‘या’ समस्या

पर्वती पोलिसांंनी गहाळ झालेल्या १५ मोबाइल संचांचा कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शोध घेतला. तक्रारदारांना पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या हस्ते मोबाइल संच परत करण्यात आले. पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गु्न्हे शाखेचे निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी धायगुडे आणि खेडकर यांनी ही कामगिरी केली.

मोबाइल संच गहाळ झाल्यास तक्रार करा शहरात गर्दीच्या ठिकाणांहून मोबाइल संच गहाळ होणे, तसेच चोरीला जाण्याचे प्रमाण मोठे आहे. मोबाइल गहाळ झाल्यास त्वरीत पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर (लाॅस्ट अँड फाऊंड) किंवा केंद्र शासनाच्या ‘सीआयइआर’ पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.