पुणे : बेकायदेशीर खरेदी-विक्री, तस्करी आणि वेगवेगळ्या कारणाने वन विभागाने ताब्यात घेतलेल्या ४१९ कासवांना वेळीच मिळालेल्या उपचारांमुळे जीवदान मिळाले आहे. ठाणे, नाशिक, सोलापूरसह विविध जिल्ह्यातील कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या कासवांवर सध्या पुण्यातील वन विभागाच्या वन्यजीव उपचार केंद्रामध्ये उपचार करण्यात येत आहेत.
वन विभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टने या उपक्रमाचे ‘प्रकल्प कासव पुनर्वसन’ असे नामकरण केले आहे. पहिल्याच महिन्यात कासवांच्या तब्येतीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. पुढील काही महिन्यातच त्यांना पुन्हा निसर्गात सोडण्यात येणार आहे. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांचा सहभागातून कासवांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
हेही वाचा – कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त; आता विद्यापीठ स्तरावर विशेष प्रवेश फेरी
प्रकल्पाबद्दल खांडेकर म्हणाले, ‘अवैध व्यापार आणि तस्करीतून सुटका केल्यानंतर वन्यप्राणी वन विभागाच्या ताब्यात येतात. त्यांची काळजी घेऊन निसर्गातील पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे, ही वन विभागाची जबाबदारी आहे. याच उद्देशातून कासवांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांत वेगवेगळ्या कारवायांमध्ये आमच्याकडे चारशेहून अधिक कासवं ताब्यात आली होती. त्यांची एकत्रित काळजी घेणे गरजेचे होते. त्यामुळे या कासवांना पुण्यातील वन्यजीव उपचार केंद्रात आणले.”
चव्हाण म्हणाले, ‘रेस्क्यूचे वैद्यकीय पथक या कासवांची काळजी घेते आहे. केंद्रात दाखल झालेल्या प्रत्येक कासवाची बारकाईने नोंद ठेवण्यापासून निसर्गात त्यांच्या पुनर्वसनापर्यंतची सविस्तर माहिती संग्रहीत करण्यात येत आहे. निसर्गात सोडण्याच्या दृष्टीने शारीरिकरित्या ती सक्षम झाल्यानंतर आम्ही अनुकूल अधिवासाची निवड करून त्यांचे पुनर्वसन करणार आहोत.’
कासव पुनर्वसन उपक्रमाचा पहिला महिना पूर्ण झाला आहे. दाखल झालेल्या कासवांपैकी अनेकांना पूर्वी दीर्घकाळ बंदिस्त जागेत ठेवले होते. काहींना पुरेसा आहार मिळाला नसल्याने तब्येत नाजूक होती. काहींना हाडाचे आजार तर काहींची परिस्थिती संसर्गजन्य आजारामुळे गंभीर होती. उपचार केंद्रात दाखल झाल्यानंतर आम्ही त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून उपचारांची दिशा निश्चित केली. आजारांनुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात आले. त्यांना पुरेसा आहार, औषधे देण्यात आली. त्यांच्या हालचालींवर नियमित लक्ष ठेवले. बहुतांश कासवांनी पहिल्या टप्प्यातच चांगला प्रतिसाद दिल्याने, तब्येतीत लक्षणीय सुधारणा दिसून आल्या. – नेहा पंचमिया, प्रमुख, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट