जागतिक पातळीवरील मंदीचे सावट आणि अनेक कंपन्यांकडून कर्मचारी कपात सुरू असूनही यंदा घरांच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत देशातील प्रमुख सात महानगरांमध्ये घरांच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत १४ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. पुण्यातील घरांच्या विक्रीत तब्बल ४२ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. याच वेळी सात महानगरांमधील घरांच्या विक्रीत मुंबई आणि पुण्याचा वाटा ४८ टक्के आहे.
जानेवारी ते मार्च या कालावधीतील मुंबई महानगर, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, चेन्नई आणि कोलकता या सात महानगरांमधील घरांच्या विक्रीचा अहवाल ‘अनारॉक रिसर्च’ने जाहीर केला आहे. यानुसार, यंदा जानेवारी ते मार्च या कालावधीत सात महानगरांमध्ये १ लाख १३ हजार ७७० घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षात याच कालावधीत ९९ हजार ५०० घरांची विक्री झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विक्रीत १४ टक्के वाढ झाली आहे. एकूण घरांच्या विक्रीत मुंबई आणि पुण्याचा वाटा ४८ टक्के आहे. याच वेळी पुण्यातील घरांच्या विक्रीत ४२ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
हेही वाचा >>>पुणे-मुंबई द्रुतगती मार्गानंतर जुन्या महामार्गावरही टोलचा भुर्दंड; प्रवास आणखी महागणार
देशातील प्रमुख सात महानगरांमध्ये पहिल्या तिमाहीत नवीन एक लाखाहून अधिक गृहप्रकल्प उभे राहिले. मागील वर्षी पहिल्या तिमाहीत ही संख्या ८९ हजार १४० होती. त्यात यंदा २३ टक्के वाढ झाली आहे. त्यातही नवीन गृहप्रकल्पांमध्ये मुंबई आणि पुण्याचा वाटा ५२ टक्के आहे. मुंबई आणि पुण्यातील नवीन गृहप्रकल्पांमध्ये यंदा अनुक्रमे ५८ टक्के आणि ३४ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
घरांच्या किमतीत या तिमाहीत ८ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबई आणि बंगळुरूमध्ये सर्वाधिक ९ टक्के वाढ झाली आहे. चालू तिमाही आणि त्याआधीच्या तिमाहीत नवीन गृहप्रकल्पांची संख्या वाढली असली, तरी विक्रीसाठी उपलब्ध घरांची संख्या जवळपास सारखी आहे. प्रमुख सात महानगरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध घरांची संख्या ६ लाख २७ हजार आहे. याचबरोबर विक्री न झालेल्या घरांच्या संख्येत एक टक्क्याने घट झाली आहे. दिल्लीतील विक्री न झालेल्या घरांच्या संख्येत तब्बल २२ टक्क्यांनी घट झाली आहे.
हेही वाचा >>>पुणे: विवाहाच्या आमिषाने फसवणूक केल्याने तरुणीची आत्महत्या; ‘एनडीए’तील जवानाविरुद्ध गुन्हा
जानेवारी ते मार्च घरांची विक्री
मुंबई महानगर : ३७ हजार २६०
पुणे : १९ हजार ४२०
हैदराबाद : १४ हजार ६२०
दिल्ली : १२ हजार ४५०
चेन्नई : ६ हजार ४१०
कोलकता : ५ हजार ८५०
निवासी गृहप्रकल्पांच्या बाजारपेठेत पहिल्या तिमाहीत तेजी दिसून आली. देशातील प्रमुख सात महानगरांमध्ये घरांची उच्चांकी विक्री झाली. मागील दशकभरातील घरांच्या विक्रीचा विक्रम या तिमाहीत मोडीत निघाला आहे.- अनुज पुरी, अध्यक्ष, अनारॉक ग्रुप