पुणे : अनेक वेळा रेल्वे गाडी पकडण्याच्या घाईत प्रवासी जीव धोक्यात घालतात. गाडी आणि फलाटाच्या मोकळ्या जागेत प्रवासी पडण्याच्या घटनाही घडतात. याचबरोबर काही जण लोहमार्गावर जाऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करतात. अशा वेळी प्रसंगावधान दाखवून रेल्वे सुरक्षा दलाचे जवान या प्रवाशांचा जीव वाचवितात. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने यंदा एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत अशा ४४ जणांचे प्राण वाचविले आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांवर रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी असते. त्याचबरोबर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचीही काळजी त्यांना घ्यावी लागते. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी जीवनरक्षक या मोहिमेचा एक भाग म्हणून मध्य रेल्वेवर एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत स्वतःचा जीव धोक्यात घालून आतापर्यंत ४४ जणांचा प्राण वाचविला आहे. त्यात एकट्या मुंबई विभागात २१ घटनांची नोंद झाली आहे. भुसावळ विभागात १५ घटना, पुणे विभागात ४, तर नागपूर विभागात २ आणि सोलापूर विभागात २ जीव वाचवण्याच्या घटनांची नोंद झालेली आहे.
आणखी वाचा-अबब! रिक्षाचालकाच्या पायातून काढली तब्बल २५ सेंटीमीटरची गाठ
रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, दहशतवादी कारवाया , रेल्वेच्या वाहतुकीत होणारा अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका, तसेच रेल्वेस्थानक आणि रेल्वे परिसरात अमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे आदी कर्तव्ये पार पाडावी लागतात. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या सुरक्षिततेकडेही त्यांना लक्ष द्यावे लागते.
प्रवाशांनी धोका पत्करू नये
काही वेळा प्रवासी निष्काळजीपणा करतात आणि धावत्या गाडीमध्ये चढताना किंवा उतरताना धोका पत्करतात. अशा प्रवाशांचा जीव वाचविण्याचे काम रेल्वे सुरक्षा दलाला करावे लागते. त्यामुळे प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या वेळेआधी स्थानकावर पोहोचणे गरजेचे आहे. याचबरोबर प्रवाशांनी धावत्या गाडीमधून चढू अथवा उतरू नये आणि जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.