सर्वाधिक ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे परिमंडल चारअंतर्गत
विसर्जन मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धुडकावून ध्वनिवर्धकांच्या भिंती उभारणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातील ४४६ मंडळांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. ध्वनी प्रदूषणाचे सर्वाधिक गुन्हे पुणे पोलिसांच्या परिमंडल चार अंतर्गत दाखल झाले आहेत. परिमंडल चार अंतर्गत येणाऱ्या नगर रस्ता,आळंदी रस्ता,येरवडा, वडगांव शेरी भागातील १२५ मंडळांविरुद्ध ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे दाखल क रण्यात आले आहेत.
पुणे शहरातील विसर्जन मिरवणुकीची सांगता शुक्रवारी (१६ सप्टेंबर) दुपारी झाली.यंदाची मिरवणूक २८ तास ३० मिनिटे चालली. लक्ष्मी रस्ता,टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या प्रमुख विसर्जन मार्गावर बहुतांश मंडळांनी उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धकांचा (साऊंड सिस्टीम) वापर केला होता. ध्वनिवर्धकांचा आवाज अक्षरश: धडकी भरविणारा होता. त्याचा त्रास विसर्जन मार्गावर राहणाऱ्या रहिवाशांना विशेषत: ज्येष्ठांना झाला. पोलिसांनी विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत उत्सवापूर्वी बैठका घेऊन संवाद साधला होता. उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धकांचा वापर करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश मंडळांनी पोलिसांच्या सूचना तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणासंदर्भात दिलेले निर्देश धुडकावून लावले. ध्वनिवर्धकांचा दणदणाट पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश भागात सुरु होता.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा भंग करणाऱ्या मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल क रण्यात आले, अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिले. शहरातील मुख्य मिरवणूक पोलिसांच्या परिमंडल एकमधून जाते. परिमंडल एकमधील ९२ मंडळांविरुद्ध ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे दाखल करण्यात आले, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी (भादंवि १८८) चार मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ध्वनिप्रदूषणाचे सर्वाधिक गुन्हे परिमंडल चारने दाखल केले आहेत. यामध्ये नगर रस्ता, येरवडा,आळंदी रस्ता, वडगांव शेरी भागाचा समावेश होतो. परिमंडल चार अंतर्गत १२५ मंडळांविरुद्ध ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे दाखल करण्यात आले, तर परिमंडल तीन अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराचा भाग येतो. तेथील ११५ मंडळांवर गुन्हे दाखल क रण्यात आले. परिमंडल दोन अंतर्गत (दक्षिण पुणे आणि लष्कर भाग) ११४ मंडळांवर पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे दाखल करण्यात आले.
पथके मोकळी; गुन्हेच दाखल नाहीत
विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांसाठी पोलिसांनी काही नियमावली केली होती. पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे मंडळांवर दाखल केले, मात्र पथकांना मोकळे सोडले. पथकांवर गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. पोलिसांनी ढोल-ताशा पथकांसोबत संवाद साधून त्यांना सूचना केल्या होत्या. मात्र, पथकांनीदेखील पोलिसांच्या सूचना पाळल्या नाहीत. काही पथकात वादकांची संख्या जास्त होती. काहींनी टोलचाही वापर केल्याचे विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळाले.