पुणे : दुबई आणि सिंगापूर येथे कार्यालये असल्याचे भासवून मुंबईतील वित्तीय संस्थेने सुमारे ४५० गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केल्याचे सांगून गुंतवणूकदारांना पैसे देण्यास नकार देण्यात आला. याबाबत पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर रेहान एंटरप्रायजेस कंपनीचे संचालक महादेव जाधव यांच्यासह अन्य संचालकांच्या विरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांनी फिर्याद दिली आहे.
मुंबईतील रेहान एंटरप्रायझेसने गुंतवणूकदारांना शेअर बाजारात तसेच परदेशी चलन व्यवहार, आभासी चलनात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले होते. दुबई, सिंगापूर येथे कार्यालये असल्याची बतावणी आरोपी जाधव याने केली होती. आकर्षक परतावा देण्याच्या आमिषाने त्याने गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले होते. फिर्यादी निवृत्त पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या नातेवाइकांनी १७ लाख रुपये गुंतवले. त्यापैकी ९ लाख ४४ हजार रुपये त्यांना परत मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला. ३० ऑगस्ट २०२२ रोजी महादेव जाधव याने ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीस ४५९ गुंतवणूकदार उपस्थित होते. या बैठकीत त्याने रेहान एंटरप्रायझेसची सर्व बँक खाती ईडीने गोठवली आहेत. त्यामुळे पुढील ३ महिने कोणालाही मुद्दल आणि व्याज मिळणार नाही. खाती सुरू झाल्यावर सर्वांची रक्कम परत करतो.
हेही वाचा >>> पुणे : आला रे आला….‘जाॅर्ज मँगो’ आला!
कोणी पोलीस तक्रार केली तर मला अटक केली जाईल तसेच कोणालाही पैसे मिळणार नाहीत, अशी बतावणी जाधव याने केली होती. त्यानंतर जाधव याने मार्च २०२३ पर्यंत गुंतवणूकदारांची रक्कम परत करणार, अशी बतावणी केली. जाधव याने पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, लातूर येथील कार्यालये बंद केल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. महादेव जाधव आणि अन्य आरोपींनी ४५९ हून अधिक गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.