देशातील पहिल्या ५० प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये पुण्यातील प्रसिद्ध डिझाइनतज्ज्ञ आणि असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाच्या संस्थापक सदस्या अश्विनी देशपांडे यांनी सलग दुसऱ्या वर्षी स्थान पटकाविले आहे. माध्यमे, विपणन आणि जाहिरात क्षेत्रातील ५० महिलांच्या सूचीमध्ये असलेल्या अश्विनी देशपांडे या ‘एलिफंट’ या नावाजलेल्या डिझाइन सल्ला आणि सेवा देणाऱ्या संस्थेच्या सहसंस्थापिका आहेत.
‘इम्पॅक्ट’ या नियतकालिकातर्फे गेल्या चार वर्षांपासून अशाप्रकारची यादी प्रकाशित केली जात आहे. या प्रतिष्ठेच्या यादीमध्ये ४५वे स्थान पटकाविणाऱ्या अश्विनी देशपांडे या डिझाइन क्षेत्रातील एकमेव महिला आहेत. तसेच त्या मेट्रो शहरातून नसलेल्या आणि पुण्यातील एकमेव डिझाइनतज्ज्ञही आहेत. या यादीमध्ये समावेश झाल्याने अश्विनी यांच्या डिझाइन क्षेत्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामाची पुन्हा एकदा दखल घेण्यात आली आहे.
अश्विनी देशपांडे यांनी अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन या संस्थेतून आपले शिक्षण पूर्ण केले असून, त्या पुण्यातील ‘एलिफंट’ या नावाजलेल्या डिझाइनविषयक सल्ला आणि सेवा देणाऱ्या संस्थेच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत. अहमदाबाद येथील इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेतर्फे ‘इंडिया स्टार्ट अप’साठी राबविण्यात येणाऱ्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड आंत्र्यप्रेन्युअरशिप उपक्रमात त्या प्रशिक्षक (मेन्टॉर) आहेत. असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया संस्थेच्या माध्यमातून व्यवसायात डिझाइनचे महत्त्व आणि डिझाइन क्षेत्रातील करीअर संधी याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम त्या करीत आहेत. अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँग, फ्रान्स आणि भारत या देशांत माध्यमे, विपणन आणि जाहिरात क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या निवड समितीच्या त्या सदस्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा