पुणे महानगरपालिकेतील ४६ टक्के महिला कर्मचाऱ्यांना सौम्य स्वरूपाचा अॅनिमिया अर्थात रक्तक्षय असल्याचे दिसून आले आहे.
नुकतीच महिलादिनानिमित्त पालिकेतील १८३ महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत ८५ महिलांचे हिमोग्लोबिन दहा ग्रॅमपेक्षा (ग्रॅम पर डेसिलिटर ब्लड) कमी असल्याचे दिसून आले आहे, तर ९२ महिलांचे हिमोग्लोबिन दहा ते बारा ग्रॅमच्या दरम्यान आहे. केवळ सहाच महिलांचे हिमोग्लोबिन बारा ग्रॅमपेक्षा अधिक आहे. पालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
निरोगी महिलेच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.१ ते १५.१ ग्रॅमदरम्यान असणे अपेक्षित असते. पुरुषांसाठी हे प्रमाण १३.८ ते १७.२ ग्रॅमदरम्यान असायला हवे असे सांगितले जाते.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीना साठे म्हणाल्या, ‘‘महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण आठ ते दहा ग्रॅम या दरम्यान असले तर त्या अवस्थेला सौम्य रक्तक्षय असे म्हटले जाते. यात थोडय़ा कामानेही थकवा येणे, कामातील दम (स्टॅमिना) कमी होणे असे त्रास संभवतात. या तुलनेत हे प्रमाण गरोदर नसलेल्या महिलांमध्ये दहा ते बारा ग्रॅमदरम्यान असले तरी त्यांच्या रोजच्या जीवनावर त्याचा फारसा परिणाम होत नाही. हिमोग्लोबिन आठ ग्रॅमच्या खाली गेले तर मात्र तो तीव्र रक्तक्षय समजला जातो.’’   
   

       

 

 

 

 

 
 

 

 
  –