पुणे : रस्ता ओलांडताना अपघात होऊन अभियंता गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांचे त्याला वाचविण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. अखेर त्याला मेंदुमृत घोषित करण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे पाच रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.

मुंढवा परिसरात रस्ता ओलांडताना ४९ वर्षीय अभियंता वाहनाची धडक बसून गंभीर जखमी झाला होता. ही घटना १३ मार्चला रात्री घडली होती. या अभियंत्याला तातडीने नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. याबाबत हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. एच. के. साळे म्हणाले की, या अभियंत्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

त्यांना १४ मार्चच्या रात्री मेंदुमृत घोषित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबाने अवयवदान करण्यास संमती दिली. त्यानंतर १५ मार्चला संध्याकाळी त्यांचे हृदय, मूत्रपिंड आणि पारपटल काढण्यात आले. हडपसर पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉर करून विविध रुग्णालयांमध्ये हे अवयव वेळेत प्रत्यारोपणासाठी पाठविण्यात आले.

या अभियंत्याच्या एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण नोबल हॉस्पिटलमधील मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या ६२ वर्षीय महिलेवर करण्यात आले. त्यांचे दुसरे मूत्रपिंड बाणेर येथील मणिपाल रुग्णालयातील रुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आले. त्याचे हृदय मुंबईतील एच.एन.रिलायन्स रुग्णालयातील रुग्णाला प्रत्यारोपित करण्यासाठी पाठवण्यात आले.

याचबरोबर त्यांच्या दोन्ही डोळ्यांची पारपटले नेत्रपेढीला दान करण्यात आली. यामुळे दोन अंध व्यक्तींना भविष्यात दृष्टी मिळणार आहे. अवयवदानाच्या प्रक्रियेत विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीसह नोबल हॉस्पिटलमधील डॉ. विक्रम सातव, डॉ. संगीता चंद्रशेखर, वैद्यकीय प्रशासक डॉ. राज कोद्रे, डॉ. शशिकांत आसबे, डॉ. संगीता चंद्रशेखर, डॉ. नीलेश वसमतकर, डॉ. अविनाश इग्नाटीअस, राकेश शिंदे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते अभिजित देशमुख, प्रवीण जाधव, प्रत्यारोपण समन्वयक विशाल तोरडे यांचा समावेश होता.