पुणे : जलसंपदा विभागाकडून कनिष्ठ अभियंता भरतीची जाहिरात प्रसिद्ध होऊन चार वर्षे उलटल्यानंतरही अद्याप ४९५ जणांना नियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी पुण्यातील सिंचन भवन येथे साखळी उपोषणाला सोमवारपासून सुरूवात केली.
जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ५०० पदांच्या भरतीसाठी २२ जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली. २५ जुलै ते १५ ऑगस्ट २०१९ या कालावधीत इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज सादर केले. राज्यातील सहा विभागीय केंद्रांवर परीक्षा घेण्याचे नियोजन होते. मात्र, करोनामुळे ही परीक्षा ६, ९ आणि १२ ऑगस्ट २०२३ मध्ये पार पडली. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. ४९५ उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. मात्र, उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळालेले नाही. संबंधित उमेदवारांनी आमदार, खासदारांसह उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, त्यानंतरही कार्यवाही झालेली नाही. या पार्श्वभूमीवर संबंधित उमेदवारांनी पुण्यातील मंगळवार पेठेतील सिंचन भवन येथे साखळी उपोषणाला सोमवारपासून सुरुवात केली आहे, अशी माहिती लक्ष्मण भुटे यांनी दिली.
हेही वाचा >>>मद्यपानाच्या मुद्द्यावरुन अजित पवारांची फटकेबाजी; “अनेकांना अख्खा खंबा घेतला तरी…”
परीक्षेचा घटनाक्रम
२२ जुलै २०१९ जाहिरात प्रसिद्ध
२५ जुलै २०१९ अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
६, ९, १२ ऑगस्ट २०२३ परीक्षा पूर्ण
२४ मार्च २०२३ सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध
१०, ११, १२ एप्रिल निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण
२० जून २०२३ रोजी ४९५ उमेदवाराची अंतिम निवड यादी प्रसिद्ध