शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाच विनयभंगाच्या घटना उघडकीस आल्या असून यामध्ये दोन विवाहित महिला, दोन तरुणी आणि एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहाजणांस अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क परिसरात बावीस वर्षीय तरुणी रस्त्याने पायी जात असताना अतुर पार्क सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने पाठीमागून येऊन विनयभंग केला. या प्रकरणी सुरक्षारक्षक अजयकुमार ओमप्रकास पांडे (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याला अटक करण्यात आली आहे. दुसरी घटना सहकारनगर येथील पद्मावती येथे घडली. विवाहित महिला टेरेसवर झोपली असता आरोपी प्रवीण सूर्यकांत भालके (वय ४०, रा. पद्मावती) याने शनिवारी महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी भालकेला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.
तिसरी घटना ही खडकी बाजार येथे घडली. आठ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून संजय शंकर प्रसादसिंग (वय ७६, रा. खडकी, मूळ- दिल्ली) याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याअनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे येथे एका १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अमर बबन कंधारे (वय ३४, रा. जयभवानी नगर, कोथरूड) याला अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजता घडली. तसेच, सांगवी येथे झालेल्या एका भांडणात पती-पत्नीस मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून दोघांना अटक करण्यात आली आहे.
शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाच विनयभंगाच्या घटना
शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाच विनयभंगाच्या घटना उघडकीस आल्या असून यामध्ये दोन विवाहित महिला, दोन तरुणी आणि एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला आहे.
First published on: 13-05-2013 at 02:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 cases of molestation in city