लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : आभासी चलनात गुंतवणूक केल्यास २०० दिवसात दुप्पट रक्कम देण्याच्या आमिषाने शहरातील अनेकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, मुख्य आरोपी पसार झाले आहेत. याप्रकरणी लिनक्स ट्रेड डॉट युके या कंपनीचे संचालक निलेश जेधे, जीवन मागाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेजण पसार झाले आहेत. त्यांचे साथीदार सागर दत्तात्रय गोऱ्हे (वय ३१, रा. नेहा कन्स्ट्रक्शन, धनकवडी), महेश लक्ष्मण भोसले (वय ३४, रा. विवा सरोवर, जांभुळवाडी, आंबेगाव), ऋत्विक मोहन पांगारे (वय २३, रा. गगन समृद्धी सोसायटी, आंबेगाव पठार, धनकवडी) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थेच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा-चऱ्होलीतील सहकारी पतसंस्थेत सव्वाकोटीचा अपहार, व्यवस्थापकासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल
आरोपी जेधे आणि मागाडे यांनी सिंहगड रस्ता परिसरातील वसंत सखा प्लाझा या इमारतीत लिनक्स ट्रेड डॉट युके या कंपनीच्या नावाने कार्यालय सुरू केले. आरोपींनी आभासी चलनात गुंतवणूक केल्यास २०० दिवसात दुप्पट रक्कम देण्यात येईल, असे आमिष दाखविले. अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक केली. सुरुवातीला परतावा दिल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास बसला. त्यानंतर अनेकांनी मोठा रक्कम गुंतविल्या, अशी माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली. आरोपी जेधे, मागाडे पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
गुंतवणूकदारांना आवाहन
पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींनी आतापर्यंत गुंतवणूकदारांची पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. ज्या गुंतवणूकदारांनी लिनक्स ट्रेड डाॅट युके या कंपनीत रक्कम गुंतविली असेल, त्यांनी गुन्हे शाखेच्या युनिट एककडे तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी केले आहे.