छोटय़ा अंतरात प्रवास करणाऱ्या पीएमपीच्या प्रवाशांना मोठा भुर्दंड पडत असल्यामुळे शहरातील सव्वीस स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन ‘मिशन पीएमपी’ सुरू केले असून पाच रुपयात पाच किलोमीटर आणि टप्पा (स्टेज) पद्धत रद्द करा या मुख्य मागण्या संस्थांनी केल्या आहेत. प्रवाशांनीही या मागण्यांचा सर्व स्तरावर पाठपुरावा करावा, असे आवाहन संस्थांनी केले आहे.
पीएमपीमध्ये तिकीटदर आकारणीसाठी टप्पा पद्धत असल्यामुळे एक ते पाच किलोमीटर अंतरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. अगदी एक ते दोन किलोमीटर अंतरासाठी दहा रुपये द्यावे लागत असून ही टप्पा पद्धत रद्द करावी अशी स्वयंसेवी संस्थांची मागणी आहे. टप्पा पद्धतीऐवजी किलोमीटर प्रमाणे दरआकारणी केल्यास कमी अंतरात प्रवास करणाऱ्यांना वाजवी दरात प्रवास करणे शक्य होईल, असे संस्थांचे म्हणणे आहे. त्यासाठी पाच रुपयात पाच किलोमीटर हे सूत्र पीएमपीने ठेवावे, अशी मुख्य मागणी आहे.
प्रवाशांनी देखील ही मागणी सर्व ठिकाणी मांडावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पीएमपी तसेच महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना आणि महापालिका पदाधिकाऱ्यांना या मागणीची पत्रे, ई मेल पाठवावेत, तसेच सर्व नगरसेवक, आमदार, खासदार यांनाही पत्रे पाठवून त्यांचा पाठिंबा या मोहिमेसाठी घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रवासी मंचतर्फे जुगल राठी आणि विवेक वेलणकर यांनी केले आहे. सर्व बस स्थानके, बस थांबे येथे या जनमोहिमेच्या पत्रकांचे वाटप करावे आणि प्रवाशांसाठी संस्थांनी आंदोलन सुरू केल्यास त्यात सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
सर्वसामान्य प्रवाशांना वाजवी दरात कार्यक्षम सेवा पीएमपीकडून मिळणे आवश्यक असताना कमी अंतरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. एक किंवा दोन थांबे एवढाच प्रवास केला तरीही दहा रुपयांचे तिकीट काढावे लागत आहे. याचा विचार प्रशासनाने केल्यास आणि किलोमीटर प्रमाणे दरआकारणी केल्यास प्रवासीसंख्या निश्चितपणे वाढेल, असे राठी यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा