शिरुर : पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव परिसरात मध्यरात्री अवजड मालवाहू ट्रकने (कंटेनर) मोटारीला धडक दिली. अपघातात मोटारीतील एकाचा कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत्युमुखी पडलेले पाच जण नगर जिल्ह्यातील शेवगाव परिसरातील रहिवासी आहेत. अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

मोटारचालक संजय भाऊसाहेब म्हस्के (वय ५३), राम भाऊसाहेब म्हस्के (वय ४५), राजवीर उर्फ राजू राम म्हस्के (वय ७) ,हर्षदा राम म्हस्के(वय ४), विशाल संजय म्हस्के (वय १६, सर्व रा़ आवाणे बुद्रुक, ता़ शेवगाव, जि़ अहमदनगर) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात साधना राम म्हस्के (वय ३५) गंभीर जखमी झाल्या आहेत.

मोटारचालक संजय म्हस्के आणि कुटुंबीय नगरहून पुण्याकडे मोटारीतून येत होते. त्या वेळी एक कंटेनर विरुद्ध दिशेने आला. रांजणगाव परिसरातील कारेगावजवळ एस नाईन हॅाटेलसमोर  कंटेनरने मोटारीला धडक दिली. त्यानंतर कंटनेर रस्त्याच्या कडेला असलेल्या वीजेच्या खांबावर आदळला. अपघातानंतर कंटनेरचालक घटनास्थळावरुन पसार झाला.

अपघाताची माहिती मिळताच शिरुर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालायत दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच पाच जणांचा मृत्यू झाला होता. अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त कंटेनर आणि मोटार क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

या प्रकरणी कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक फौजदार मुश्ताक मौला शेख यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. पसार झालेल्या कंटेनरचालकाचा शोध घेण्यात येत आहे, असे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी सांगितले.

मुलीचा विवाह सोहळा पार पाडल्यानंतर काळाचा घाला

अपघातात मृत्युमुखी पडलेले म्हस्के कुटुंबीय कामानिमित्त नवी मुंबईतील पनवेल परिसरात वास्तव्यास आहे. संजय म्हस्के शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी बस चालवितात. त्यांचा भाऊ राम रिक्षाचालक आहे. मनमिळाऊ स्वभावाचे म्हस्के बंधू प्रत्येकाला मदत करायचे. म्हस्के यांचा भाऊ राज याचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. संजय यांच्या मागे दोन मुली, दोन मुले, आई असा परिवार आहे. आई गावात राहते. संजय यांच्या एका मुलीचा १५ ऑगस्ट रोजी विवाह पार पडला. एका मुलीचा साखरपुडा झाला होता. मुलीचा विवाह सोहळा पार पाडून संजय आणि म्हस्के कुटुंबीय पनवेलकडे मध्यरात्री मोटारीतून निघाले होते. मुलीचा विवाह पार पडल्यानंतर म्हस्के कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. ही घटना उघडकीस आल्यानंतर आवणे गावात शोककळा पसरली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आवणे गावातील रहिवासी रुग्णालयात आले. त्या वेळी ग्रामस्थ तसेच नातेवाईकांना अश्रू अनावर झाले.

Story img Loader