पिंपरी पालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीनुसारच अध्यक्षपदाचे नाव ठरणार असले तरी परंपरेप्रमाणे स्थानिक नेते आपलेच घोडे दामटण्याच्या तयारीत आहेत. एक एप्रिलला निवडणूक असली तरी उमेदवारीअर्ज गुरुवारी (२८ मार्च) दाखल होणार असल्याने तेव्हाच चित्र स्पष्ट होणार आहेत.
अध्यक्षपदासाठी नवनाथ जगताप, महेश लांडगे, सुनीता वाघेरे, अविनाश टेकवडे आणि चंद्रकांत वाळके या पाचजणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. विरोधकांचे ‘बळ’ दखलपात्र नसल्याने अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचाच उमेदवार बसणार आहे. नवनाथ जगताप हे आमदार लक्ष्मण जगताप यांचे तर टेकवडे व वाघेरे आमदार अण्णा बनसोडे यांचे समर्थक गटातील आहेत. महेश लांडगे नात्याने आमदार विलास लांडे यांचे भाचेजावई आहेत. मात्र सध्या त्यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. लांडगे यांची राजकीय ‘झेप’ लांडेंच्या दृष्टीने अडचणीची ठरणार असल्याने तूर्त आमदारांची भूमिका गुलदस्त्यात आहे. ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष आझम पानसरे व शहराध्यक्ष योगेश बहल हे निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावू शकणारे नेते आहेत. यापैकी पानसरेंनी कोणतीच भूमिका घेतलेली नाही, तर बहलांचा  थेट समर्थक उमेदवार रिंगणात नसल्याने त्यांनी पत्ते उघड केलेले नाहीत. मागील वेळी नवनाथ जगतापांना उमेदवारी देण्याची सूचना अजित पवार यांनी केली होती, तेव्हा बहल यांनी जगदीश शेट्टी यांच्यासाठी अजितदादांकडे मनधरणी केली व त्यांना अध्यक्षपद देणे कसे गरजेचे आहे, असे पटवून दिले. बऱ्याच नाटय़मय घडामोडी होऊन शेट्टींची वर्णी लागली होती. नवनाथ जगतापांची समजूत काढण्यासाठी पुढील वर्षी अध्यक्षपद देतो, असा शब्द अजितदादांनी बहल यांच्या साक्षीने दिला होता.
वर्षभरात बरेच पाणी पुलाखालून गेले. शेट्टी यांनी बहल यांच्यासह सर्वानाच आपले मूळ गुण दाखवले. त्यातून धडा घेत आपल्या ‘ऐकण्यातील’ अध्यक्ष व्हावा, हीच स्थानिक नेत्यांची पहिली अपेक्षा आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या सोयीचा कोण आहे, त्यावरच त्याची खरी शिफारस अजितदादांकडे होणार आहे. मात्र, आतापर्यंतचा इतिहास पाहता सर्वाचे ऐकून घेऊन स्वत:च्या राजकीय डावपेचानुसार उमेदवार निवडण्याची अजितदादांची पद्धत आहे. त्यामुळे स्थायी अध्यक्षपदाची लाखमोलाची लॉटरी कोणाला लागणार, हे गुरुवारी स्पष्ट होणार असून तोपर्यंत राष्ट्रवादीत राजकीय धुळवड उडणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 ncp corporator interested in pcmc standing committee election
Show comments