पुणे आणि पिंपरीतील प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीतर्फे पाच नवे मार्ग सुरू करण्यात आले आहेत. निगडी ते रावेत पूल, महात्मा फुले मंडई आणि पुणे स्टेशन ते पाषाण, महापालिका भवन ते वडगावशेरी या मार्गावर या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
निगडी ते रावेत पूल मार्गे गणेश तलाव, आकुर्डी रेल्वे स्टेशन या मार्गावर क्रमांक ३०३ अ ही फेरी सुरू करण्यात आली असून दर तीस मिनिटांनी निगडी आणि रावेत येथून या मार्गावर फेऱ्या होतील. महात्मा फुले मंडई ते पाषाण (सुतारवाडी) या नव्या मार्गावरील फेऱ्या प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता या मार्गे होणार असून दर दोन तासांनी या मार्गावर पीएमपीच्या फेऱ्या होतील. या मार्गावरील गाडय़ांसाठी ८७ ब हा क्रमांक देण्यात आला आहे. पुणे स्टेशन ते पाषाण (सुतारवाडी) या नव्या मार्गावरील गाडीसाठी १४५ ब हा क्रमांक देण्यात आला असून दर एक तास पन्नास मिनिटांनी या मार्गावर पीएमपीच्या फेऱ्या होतील.
महापालिका ते वडगावशेरी मार्गे शुभम सोसायटी या मार्गावर दर एक तास पन्नास मिनिटांनी पीएमपीच्या फेऱ्या होणार असून १३२ अ या क्रमांकाच्या गाडय़ा या नव्या मार्गावर उपलब्ध असेल. त्या बरोबरच महापालिका ते वडगावशेरी मार्गे आनंद पार्क या मार्गावरही दर एक तास पन्नास मिनिटांनी पीएमपीच्या फेऱ्या होणार आहेत. या मार्गासाठी १३३ अ असा क्रमांक देण्यात आला आहे.

Story img Loader