पीएमपीच्या डेपोंसाठी तसेच सीएनजी स्टेशनसाठी महापालिकेने जागा देण्यासंबंधी पीएमपीने केलेली मागणी मान्य झाली असून अशा पाच जागा पीएमपीला देण्याचा निर्णय संयुक्त बैठकीत घेण्यात आला. आंबेगाव, कोथरूड, वडगाव बुद्रुक, धायरी येथील जागा पीएमपीला पार्किंगसाठी आणि कोथरूड येथील एक जागा सीएनजी स्टेशन उभारण्यासाठी देण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त महेश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक आर. एन. जोशी, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, अतिरिक्त नगर अभियंता विवेक खरवडकर या वेळी उपस्थित होते. महापालिकेच्या ताब्यात आलेल्या अ‍ॅमिनिटी स्पेसच्या जागांपैकी ११ जागा पीएमपीने मागितल्या होत्या. पीएमपीला पार्किंगसाठी तसेच सीएनजी पंपांसाठी व अन्य कारणांसाठी जागांची आवश्यकता असून त्यासाठी महापालिकेने पीएमपीला जागा द्याव्यात, असा प्रस्ताव होता. त्यातील पाच जागा पीएमपीला देण्याबाबत निर्णय बैठकीत घेण्यात आला.
शालेय वाहतुकीसाठी जादा गाडय़ा
पीएमपीकडे नवीन येणाऱ्या गाडय़ा प्राधान्याने शालेय वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याबाबतही एका बैठकीत निर्णय घेण्यात आला. व्यवस्थापकीय संचालक आर. एन. जोशी, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीण अष्टीकर तसेच शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप धुमाळ, मंडळाचे सदस्य रघु गौडा, मंजुश्री खर्डेखर यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी काही मार्गावर गाडय़ा सोडण्याची तसेच गाडय़ांची आवश्यकता असून त्याबाबत संयुक्त पाहणी करून निर्णय घ्यावा, असेही या वेळी निश्चित करण्यात आले. पाहणीनंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्रापासून जादा गाडय़ा उपलब्ध करून दिल्या जातील, असे या वेळी सांगण्यात आले. शाळांच्या सकाळ व दुपारच्या वेळात काही बदल करून दोन्ही सत्रात गाडय़ा देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

Story img Loader