इंदापूर : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरघाव वेगाने जाणाऱ्या मोटारीवरील ताबा सुटल्याने मोटार उलटून झालेल्या अपघातात पाच जण ठार, तर एक जण जखमी झाला. भिगवणजवळील डाळज (ता. इंदापूर) येथे मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रफिक कुरेशी (वय ३४), इरफान पटेल (वय २४), मेहबूब कुरेशी (वय- २४) फिरोज कुरेशी (वय २८) फिरोज कुरेशी (वय २७) (सर्व रा. नारायणखेड, जिल्हा मेंढक, तेलंगणा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. आहेत.सय्यद इस्माईल अमीर (वय २३) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर भिगवणमध्ये उपचार सुरू आहेत.
हेही वाचा >>> पावसाचा अंदाज का चुकतो? हवामानातील वैविध्य, अपुरे तंत्रज्ञान यामुळे मर्यादा
तेलंगणा राज्यातील सहा युवक पर्यटनासाठी महाराष्ट्रात आले होते. ते घरी जात असताना भिगवणजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोटार उलटली. त्यामुळे ही दुर्घटना घडली. इंदापूर तालुका परिसरामध्ये चार वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळत होत्या. अपघात झाला त्या ठिकाणी उतार ओलांडून मोटार पुढे आली होती. मोटार भरघाव वेगाने असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. मोटार तीन चार वेळा उलटल्याने पाचजणांचा जागीच मृत्यू झाल्याचे भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी सांगितले. अपघाताचे वृत्त समजतात महामार्ग वाहतूक पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक महेश कुपेवाड व त्यांचे सहकारी, तसेच भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात भिगवण येथे दाखल करण्यात आले. मात्र, पाच जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.