पुण्यातील चाकण येथे कारमध्ये गुदमरुन पाच वर्षांच्या मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. करण पांडे असे या चिमुकल्याचे नाव असून खेळता खेळता तो घराजवळ पार्क केलेल्या एका कारमध्ये जाऊन बसला होता. मात्र, कार आतून लॉक झाल्याने करण आतमध्येच अडकला आणि त्याचा गुदमरुन मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चाकण येथे राहणारा करण पांडे हा मुलगा सोमवारी दुपारी त्याच्या मित्रांसोबत घराबाहेर खेळत होता. दुपारी बाराच्या सुमारास तो खेळता खेळता उन्हात उभी असलेल्या इस्टिम गाडीत बसला. याच दरम्यान कार लॉक झाली आणि तो कारमध्ये अडकला. काचा बंद असल्याने त्याचा गुदमरुन मृत्यू झाला. उन्हामुळे त्याला चटके देखील बसले होते.

दुसरीकडे पांडे कुटुंबियांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. अखेर संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास पांडे कुटुंबीयांना त्याचा मृतदेह कारमध्ये आढळला. पांडे कुटुंबीयांच्या घराजवळ पार्क केलेली इस्टिम कार गेल्या दोन महिन्यांपासून नादुरुस्त अवस्थेत होती.

मुलाचे वडील अखिलेश पांडे यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत त्यामुळे संशय बळावत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या तीन वर्षांपासून खराळवाडी चाकण येथे पांडे कुटुंबीय राहात आहे. हे कुटुंब मूळ उत्तर प्रदेशातील आहे.