िपपरी-चिंचवड महापालिकेने सामान्यकर व मलप्रवाह करात एक टक्का वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ३० हजारांच्या पुढे कर भरणाऱ्या नागरिकांना सहा टक्के सामान्य कर लागू करण्यात येणार आहे. महिलांच्या नावे असलेल्या मिळकतींना सामान्य करात ५० टक्के सवलत देण्यास सभेने मंजुरी दिली आहे. याशिवाय, शिक्षण मंडळाच्या २०१३-१४ वर्षांच्या १०९ कोटी ३८ लाख रूपये खर्चाच्या अंदाजपत्रासही मान्यता देण्यात आली.
महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी उशिरापर्यंत चाललेल्या सभेत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रशासनाने आर्थिक वर्षांसाठी चार टक्के ते  किमान १३ टक्के वाढ सुचवली होती. तथापि, सदस्यांनी या करवाढीस विरोध दर्शवला. स्थायी समितीने मतदारांची नाराजी नको म्हणून करवाढीचा विषय फेटाळून अंतिम निर्णय सभेने घ्यावा, अशी शिफारस केली होती. करवाढीमुळे पालिकेच्या उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात भर पडेल, असा युक्तिवाद अधिकाऱ्यांकडून केला जात होता. करवाढीच्या प्रस्तावाला सत्ताधारी राष्ट्रवादीने उपसूचना देत महिलांना मिळकतकरात ५० टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्याचप्रमाणे, स्वातंत्र्यसैनिक व माजी सैनिकांच्या पत्नीच्या नावे असलेल्या मिळकतींनाही सवलत देण्यात येणार आहे.
शिक्षण मंडळाचे अंदाजपत्रक मंजूर करताना मंडळाच्या कारभाराची बहुतांश सदस्यांनी चिरफाड केली. अंदाजपत्रकात आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी नऊ कोटी रूपयांची कपात सुचवली होती. मात्र, ई लर्निग, खेळ शाळा, शालेय साहित्य, पी. टी. गणवेश, विद्यार्थी स्वेटर, या लेखाशीर्षांमध्ये आयुक्तांनी सुचवलेल्या तरतुदीत वाढ करण्यात आली. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना स्वेटर खरेदीसाठी एक कोटी ८५ लाख रूपये व गणवेशासाठी चार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
–चौकट–
‘एलबीटी’ मुळे ३०० कोटींची तूट
जकात रद्द करून ‘एलबीटी’ लागू होणार आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत ३०० कोटींची तूट येण्याची शक्यता आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सभेत व्यक्त केली. चालू आर्थिक वर्षांत १३०० कोटी उत्पन्न जकातीतून अपेक्षित असताना ११०० कोटीच मिळाले. सुरूवातीला एलबीटी उत्पन्नाचे उद्दिष्ट १५०० कोटी ठरवण्यात आले होते. मात्र, आता १२०० कोटी अपेक्षित धरण्यात आले आहे.

Story img Loader