भक्ती बिसुरे
पुणे : जगाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे निम्म्या नागरिकांना विविध प्रकारच्या तोंडाच्या आजारांनी ग्रासले असून त्यामागे तंबाखू सेवन, दंतरोग आणि स्वच्छतेचा अभाव ही प्रमुख कारणे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे.तोंडाच्या आजारांमध्ये प्रामुख्याने विविध प्रकारचे दंतरोग, हिरडय़ांचे आजार, श्वासाची दुर्गंधी, तोंड आणि जिभेचा कर्करोग, अल्सर यांचा समावेश असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच सुमारे १९४ देशांतील माहितीच्या विश्लेषणावर आधारित अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्याद्वारे जागतिक स्तरावर तोंडाच्या आजारांचा भार (डिसीज बर्डन) याबाबतचे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. जगातील सुमारे ४५ टक्के किंवा ३५० कोटी लोकसंख्येला तोंडाच्या विविध आजारांनी ग्रासले आहे. यांपैकी बहुसंख्य नागरिक हे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील असून तोंडाच्या आजारांचा जागतिक लोकसंख्येवरील भार गेल्या ३० वर्षांत लक्षणीयरित्या वाढल्याचे या अहवालातून म्हटले आहे. आहारातील अतिरिक्त साखर, धूम्रपान, मद्यपान, तंबाखू सेवन अशी काही प्रमुख कारणे अशा आजारांना निमंत्रण देत असल्याचेही या अहवालात अधोरेखित केले आहे. मौखिक आरोग्य हा सर्वच समाज स्तरांवर अत्यंत दुर्लक्षित विषय आहे. अत्यंत साध्या आणि स्वस्त उपाययोजना, दात आणि तोंडाच्या आरोग्याबाबत जनजागृती या मार्गानी आजारांची गुंतागुंत रोखणे शक्य आहे, असेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
सर्वाधिक आणि सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या तोंडाच्या आजारांमध्ये दातांच्या तक्रारींचा समावेश आहे. दातांमधील कीड, हिरडय़ांचे आजार, दात निकामी होणे, तोंडाचे विविध प्रकारचे कर्करोग अशा अनेक किरकोळ आणि गंभीर स्वरूपाच्या आजारांचा तोंडाच्या आजारांमध्ये समावेश होतो. दीर्घकाळ दुर्लक्ष, त्यातून लांबलेले निदान यांमुळे त्यांपैकी अनेक आजार गंभीर रूप धारण करण्याचा धोका असतो. सुमारे २५० कोटी लोकसंख्येच्या तोंडाच्या आजारांचे मूळ हे दुर्लक्षित राहिलेल्या दातांच्या तक्रारींमध्ये असल्याचे यानिमित्ताने घेण्यात आलेल्या आढाव्यावरून स्पष्ट झाले आहे. दरवर्षी केवळ तोंडाच्या कर्करोगाचे ३.८० लाख नवे रुग्ण जगात सापडतात, याकडेही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.
आजारव्याप्तीची कारणे..
प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मोठय़ा आर्थिक तरतुदीची गरज.
प्राथमिक आरोग्य सेवांचा प्रचार आणि प्रसारासाठी पुरेशा तांत्रिक प्रगतीचा अभाव.
माहिती संकलन, विश्लेषण आणि त्यांवर आधारित धोरणाचा अभाव.
प्रतिबंधात्मक उपाय काय?
आहारातील अतिरिक्त साखर, तंबाखू सेवन, मद्यपान, धूम्रपान यांवर नियंत्रण.
चांगल्या प्रतीच्या फ्लोराईडयुक्त टूथपेस्टच्या वापरासाठी प्रोत्साहन.
तोंडाच्या आरोग्य आणि रोगनिदानासाठी जनजागृती. लवकर निदान आणि औषधोपचारांची गरज.