कर संकलनाचा “पीसीएमसी पॅटर्न” यशस्वी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीत चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये चांगलीच भरारी घेतली आहे. एप्रिल ते जुलै या गेल्या चार महिन्यांतच कर संकलन विभागाने तब्बल ५०० कोटी रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. विशेष म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) मध्ये एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत फक्त २८७ कोटींची वसुली झाली होती.
हेही वाचा >>> पुणे शहरातील पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्यात आला : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
गतवर्षीच्या तुलनेत यंदा मालमत्ता कराची वसुली तब्बल २१० कोटींनी जास्त झाली आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या कर वसुलीच्या या नव्या ‘पॅटर्नची’ चर्चा सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा कर आकारणी व करसंकलन विभाग गेल्या वर्षभरापासून सातत्याने वसुलीचे नवनवीन विक्रम करीत आहे.
हेही वाचा >>> पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून संभाजी भिडेंच्या पोस्टरला जोडे मारताना एक जोडा राहुल गांधींच्या फोटोलाही
महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी जास्तीतजास्त मालमत्ता कराची वसुली होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने एक पॅटर्न सुरू केलाय. त्यानुसार डेटा ॲनालिटिक्स, सोशल मीडिया जनजागृती, विविध स्पर्धांच्या माध्यमातून नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी प्रोत्साहन देणे, गेल्या पाच वर्षांपासून महानगरपालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्यांची यादी काढून त्यांना जप्तीची नोटीस देणे, त्यांच्यावर जप्ती कारवाई करणे, थकबाकीदारांना टेलिकॉलिंग, एसएमएस करणे, सिद्धी प्रकल्पातून शंभर टक्के बिलांचे वाटप आदींवर करसंकलन विभागाकडून भर दिला जातोय.