लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात करोना संसर्ग होऊन मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येत होती. ही योजना १ मार्चपासून बंद करण्यात आली आहे. मात्र, अनुदानापासून वंचित राहिलेल्या ७५० पैकी ५०० जणांच्या वारसांना लाभ देण्यात आला आहे. कागदपत्रे अपूर्ण असल्याने अद्यापही २५० लाभार्थी हे प्रतीक्षेत आहेत.
शहरासह जिल्ह्यातील ७५० करोना मृतांच्या वारसांनी योजना बंद होण्याआधी अनुदानासाठी अर्ज करूनही त्यांना लाभ देण्यात येत नव्हता. याबाबत ‘लोकसत्ता’ने १५ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून ५०० जणांना लाभ मिळवून दिला आहे. अद्यापही २५० जणांना लाभ देण्याचे बाकी आहे.
हेही वाचा… पुण्यावर फुली! लायसन्स स्मार्ट कार्ड छपाई फक्त मुंबई, नागपूर, औरंगाबादमध्येच
राज्यात करोनाचा रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील २० हजार ६३७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. करोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधितांच्या नातेवाइकांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची योजना महाविकास आघाडी सरकारने सुरू केली होती. ती १ मार्चपासून राज्य सरकारने बंद केली. मात्र, १ मार्चपूर्वी करोनामुळे मृत्यू झालेल्या शहरासह जिल्ह्यातील ७५० जणांचे अर्ज प्रलंबित होते.
उर्वरित अर्जांसाठी पाठपुरावा सुरू
जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागातील कक्ष अधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडून आरोग्य विभाग आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांना संबंधित अर्जांबाबत माहिती देत पुन्हा कागदपत्रे पाठविली आहेत. तसेच अर्जदारांनी अर्ज भरताना सादर केलेले बॅँक खाते क्रमांक असलेल्या बँकांतही संपर्क साधून ग्राहकांची ओळख पडताळणी प्रक्रिया (केवायसी), आधार आणि इतर पडताळणी सुरू केली आहे. दुबार अर्ज आले असल्यास त्यातील एकच अर्ज ग्राह्य धरला जाणार असल्याचे नातेवाइकांना देखील कळविण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात ५०० अर्ज मंजूर झाले आहेत. उर्वरित २५० अर्जांबाबतही पाठपुरावा करण्यात येत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी सांगितले.