धाराशिव : कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिर समितीच्यावतीने ऑनलाईन स्पेशल देणगी दर्शन पास सुविधा सुरू केली आहे. मंदिराच्या प्रशासन कार्यालयातील तळमजल्यावर ऑफलाईन पद्धतीने ही सुविधा पूर्वीपासूनच सुरू आहे. देणगी दर्शनसाठी २०० आणि ५०० रुपये प्रति पास अशा दोन सुविधा मंदिर समितीकडून यापूर्वीपासूनच उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यातीलच पाचशे रुपयांच्या दर्शन पाससाठी ऑनलाईन सेवेची सुरुवात मंदिर समितीच्यावतीने करण्यात आली आहे. राज्य आणि देशभरातील भाविकांना मोबाईल अ‍ॅपवरूनही पास काढून घेता येणार आहे. मोबाईल अ‍ॅपची सेवा सोमवार, २२ जुलैपासून कार्यान्वित होणार आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ म्हणून ओळख असलेल्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी राज्य आणि देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. ऐनवेळी भाविकांच्या गर्दीचे नियोजन करताना मंदिर प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीकडून देणगी दर्शन सुविधा मागील अनेक वर्षांपासून अंमलात आणली आहे. धर्मदर्शन, मुखदर्शन, कलशदर्शन करण्याकरिता भाविकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही. रांगेत थांबून दर्शनाचा लाभ घेता येतो. रांग टाळून कमी वेळेत तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी दोनशे आणि पाचशे रुपयांच्या देणगी दर्शनाची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. याबरोबरच मंदिर समितीकडून ऑनलाईन देणगी, ऑनलाईन दर्शन पासची सुविधा ऑनलाईन पद्धतीने अभिषेक, त्याचबरोबर ऑनलाईन प्रणालीचा वापर करून सिंहासन पूजेची नोंदणी देखील करता येते.

हेही वाचा – Maharashtra Rain Update: येत्या २४ तासांत विदर्भासह कोकण, पश्चिम किनारपट्टी क्षेत्रात पावसाचा “रेड अलर्ट”

हेही वाचा – मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; RTE प्रवेशाबाबतचा ‘तो’ अध्यादेश रद्द करत राज्य सरकारला फटकारलं!

आषाढी एकादशीपूर्वी तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या विविध सेवा सुविधांची पाहणी केली होती. तुळजाभवानी मंदिरात विठ्ठल मंदिराप्रमाणे कोणत्या सुविधा राबविता येतील, याचा आढावाही ओंबासे यांनी घेतला होता. त्यानंतरच यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने सुरू असलेली ५०० रुपयांची स्पेशल दर्शन पासची सुविधा आता ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. गुगल प्ले स्टोअरवर मंदिर समितीने तयार केलेल्या मोबाईल अ‍ॅपवरून या स्पेशल देणगी दर्शन पासची नोंदणी आता करता येणार असल्याची माहिती मंदिराचे तहसीलदार सोमनाथ माळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.