पुणे: राज्य परिवहन मंडळाच्या डिझेलवरील पाच हजार वाहने द्रवरूप नैसर्गिक वायू इंधनावर (एलएनजी) रूपांतरित करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी पुढील चार वर्षांत ९७० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. ‘एलएनजी’चे पंप आणि अन्य सुविधा उपलब्ध नसतानाही ही उधळपट्टी करण्यात येणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सन २०२३-२४ या वर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणात हरित परिवहन या उपक्रमांतर्गत डिझेलवरील पाच हजार गाड्यांचे रूपांतर ‘एलएनजी’मध्ये करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या २२ नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या बैठकीत डिझेलवर चालणाऱ्या पाच हजार गाड्या द्रवरूप नैसर्गिक वायू इंधनावर रूपांतरित करण्यासाठी स्रोतनिश्चिती करणे, प्रतिबस १९.४० लाख याप्रमाणे पाच हजार गाड्यांसाठी ९७० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडे मागण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी दिली होती. या प्रस्तावानुसार २०२४-२०२५ वर्षासाठी ४० कोटी आणि त्यानंतरच्या पुढील तीन वर्षांसाठी अनुक्रमे २००, २७० आणि ३६० कोटी अशा एकूण ९७० कोटींच्या निधीचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी परिवहन महामंडळाकडे या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा >>>PCMC : महापालिकेची ‘ई-रुपी’ प्रणाली अपयशी; पाच हजार विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित

डिझेलवरील गाड्या ‘एलएनजी’मध्ये रूपांतरित करण्यात येणार असल्या, तरी डिझेलवरील गाड्यांचे आयुर्मान चार ते पाच वर्षे बाकी आहे. त्यामुळे त्यांच्यावर एवढा मोठा खर्च करणे योग्य नाही. तसेच एलएनजीचे पंपही राज्यात अस्तित्वात नाहीत. ‘एलएनजी’ तंत्रज्ञानातील देखभाल-दुरुस्तीसाठीही फारशा सोई-सुविधा नाहीत. एलएनजीवर गाड्या रूपांतरित करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी त्याच रकमेत सीएनजीवर चालणाऱ्या किमान दोन हजार गाड्या घेता येतील. त्याद्वारे पुढील दहा वर्षे प्रवाशांना सेवा दिली जाऊ शकते. त्यामुळे महामंडळाने निर्णयाचा फेरविचार करावा आणि जनतेच्या करांच्या पैशाचा सदुपयोग करावा, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5000 diesel vehicles of state transport st to be converted to liquefied natural gas lng pune print news apk 13 amy