कर्नाटकातून शहरात विक्रीसाठी पाठविण्यात आलेले चार हजार ९७० किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले. कात्रज चौकात गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली. या कारवाईसाठी अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाने सहकार्य केले. कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त पनीर विक्रीसाठी पाठविण्यात जात असल्याची माहिती दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाला मिळाली. कात्रज चौकात पनीर वाहतूक करणारा टेम्पो थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने टेम्पोचालकाला ताब्यात घेतले.
हेही वाचा >>> खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य ‘क्रीडा दिन’ म्हणून साजरा करणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
टेम्पोतून दहा लाख रुपयांचे चार हजार ९७० किलो पनीर जप्त करण्यात आले. अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांना ही माहिती कळविण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार भेसळयुक्त पनीर बाणेर येथील नॅशनल ॲग्रीकल्चर अँड फूड ॲनलसिस ॲंड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (नाफरी) प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणीत पनीर भेसळयुक्त असल्याचा अहवाल देण्यात आला. त्यानंतर भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक शाहिद शेख, सुमीत ताकपेरे, महेश पाटील आदींनी ही कारवाई केली.