पुणे : महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन महाडीबीटी मार्फत थेट लाभ स्वरुपात (डीबीटी) देण्यात येणार आहे. सदर विद्यावेतन हे शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेंतर्गत देण्यात येणारे विद्यावेतनाव्यतिरिक्त अतिरिक्त स्वरुपात ७५ टक्के किंवा पाच हजार रुपये यापैकी कमी असलेले विद्यावेतन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेंतर्गत विद्यावेतनाचा लाभ न घेणाऱ्या शिकाऊ उमेदवारांना महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेंतर्गत थेट स्वरुपात पाच हजार रुपये विद्यावेतन अदा करण्यात येईल.
उद्योग, रोजगार, कौशल्य आणि नाविन्यता विभागाने या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती वाढवून प्रोत्साहन देण्यासाठी शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेस पूरक ठरणाऱ्या ‘महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेला २०२१मध्ये मान्यता देण्यात आली होती. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी संचालनालयाच्या स्तरावर कक्ष स्थापन करण्यात येईल. त्यासाठी पाच टक्के निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच सर्व लाभार्थीना अचूक तपशीलाद्वारे डीबीटीच्या माध्यमातून विद्यावेतनाचे वितरण केले जाईल. पुढील वर्षी महाडीबीटी संकेतस्थळाद्वारे ही योजना राबवण्यात येईल. २०२२ – २०२३ या आर्थिक वर्षात प्रलंबित विद्यावेतन हे ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.