भारती विद्यापीठाचा ५१ वा वर्धापनदिन १० मे रोजी साजरा होणार असून, या कार्यक्रमाला राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे- पालवे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विद्यापीठाचे कार्यवाह व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
विद्यापीठाच्या धनकवडी येथील प्रांगणात वर्धापनदिनाचा सोहळा होणार आहे. मुंडे यांच्यासह खासदार राजीव सातव, पत्रकार उदय निरगुडकर हेही उपस्थिती लावणार आहेत. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम असतील. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ते परदेश दौऱ्यावर असल्याने जूनमध्ये येणार आहेत. त्या वेळी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांचा सांगता समारंभ होईल. विद्यापीठाचा आढावा घेणारे संग्रहालय व संशोधनासाठी उभारलेल्या नव्या इमारतीचे उद्घाटनही राष्ट्रपतींच्या हस्ते होईल, असे कदम यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या योजनांबाबत सांगताना ते म्हणाले, अमेरिकेमध्ये ४० हजार मराठी कुटुंबांतील मुलांना मराठी लिहिता-वाचता येण्याच्या दृष्टीने बृहन्महाराष्ट्र मंडळ व भारती विद्यापीठ मराठी भाषा वर्ग चालविते. आता एक जुलैपासून युनायटेड किंगडममध्येही हे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा