लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: शहरातील इमारतींच्या टेरेसवर असलेल्या ५२ ‘रूफ टॉप’ हॉटेलचालकांवर कारवाईचा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिला आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाने संबंधितांना नोटीस पाठविल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विकास होत असून लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे शहर परिसरात विविध व्यवसायांसह हॉटेलची संख्यादेखील सातत्याने वाढत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून इमारतीच्या टेरेसवर हॉटेलचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांच्या तसेच कामगारांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी न घेता शहरात टेरेसवर हॉटेल सुरू आहेत. याबाबत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील टेरेसवरील हॉटेलची शोधमोहीम राबविली. हॉटेलमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याचे पाहणीत आढळून आले. त्यामुळे अग्निशमन विभागाने ५२ टेरेसवरील हॉटेल चालकांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे.
आणखी वाचा-पुण्यातील ‘हा’ ब्रिटिशकालीन पादचारी पूल पुन्हा खुला
हॉटेल व्यवसाय अनधिकृतरीत्या व अवैधरीत्या नसल्याबाबत सिद्ध करावे, बांधकाम परवानगी विभागामार्फत इमारतीचा संपूर्ण मंजूर नकाशा संच, इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र, पूर्णत्वाचा दाखला, वार्षिक नूतनीकरण केलेला अग्निशमन ना हरकत दाखला, अन्न व औषध प्रशासन विभागाचे परवाना प्रमाणपत्र, दुकाने निरीक्षक कार्यालयाचा दुकान कायदा परवाना, आकाशचिन्ह व परवाना विभागाचे हॉटेल व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र, विद्युत निरीक्षक यांच्याकडील विद्युत यंत्रणा सुरक्षितता प्रमाणपत्र, गॅस वितरकाचे प्रमाणपत्र, हॉटेल जागा, मिळकत मालकी हक्क संबंधित सर्व दस्तावेज, भागीदारपत्र, भाडे तत्त्वावर असल्यास भाडेकरारनामा, मद्यसाठा होत असल्यास त्याचे वैध मद्य विक्री परवाना प्रमाणपत्र, हॉटेलचा मालक, चालक आणि व्यवस्थापक यांचे ओळखपत्र आणि पालिकेच्या आरोग्य विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहरातील इमारतींवरील हॉटेलची पाहणी करण्यात आली. त्रुटी आढळलेल्या ५२ हॉटेल चालकांना नोटीस देऊन विविध प्रमाणपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. -विजयकुमार थोरात, साहाय्यक आयुक्त, अग्निशमन विभाग