लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: समाजमाध्यमावर अनोळखी महिलेशी झालेली ओळख एका व्यावसायिकाला महागात पडली. महिलेच्या साथीदारांनी पोलीस असल्याच्या बतावणीने व्यावसायिकाकडील ५३ हजारांची रोकड लुटल्याची घटना वारजे भागात घडली.
याबाबत एकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार मनीषा नावाच्या महिलेसह दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व्यावसायिक असून, पिंपरी-चिंचवडमधील रावेत भागात राहायला आहेत. व्यावसायिकाला समाजमाध्यमात मैत्रीची विनंती महिलेने पाठविली होती.
आणखी वाचा-पुण्याच्या मावळमध्ये पवना नदीच्या काठावर सुरू होता गावठी हातभट्टीचा गोरख धंदा, पोलिसांनी मारला छापा!
महिलेने व्यावसायिकाशी संपर्क साधून त्याला वारजे भागातील एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले. तेथे दोघेजण थांबले होते. त्यांनी व्यावसायिकाला धमकावून पोलीस असल्याचे सांगितले. तू मुलींना फसवतो. त्यांचे चित्रीकरण करतो, अशा तक्रारी आल्या आहेत. तुझी चौकशी करायची आहे, असे सांगून त्याला वारजे भागातील एका एटीएम केंद्राजवळ नेले.
व्यावसायिकाला धमकावून दोघांनी एटीएममधून ५३ हजार रुपयांची रोकड काढून घेतली. त्यानंतर दोघेजण पसार झाले. त्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक अकोलेकर तपास करत आहेत.