पिंपरी : डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने महापालिका आरोग्य विभागाने शहरातील दोन लाख ६९ हजार ७५४ घरांची तपासणी केली. पाच हजार ४५९ कंटेनरमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. साडेआठ लाखांचा दंड वसूल केला आहे.
आरोग्य विभागाने १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत तपासणी मोहीम राबविली. ९९२ टायर आणि भंगार दुकाने, १ हजार १५४ बांधकामांची तपासणी करून तीन हजार ५३० कंटेनर रिकामे केले. यामधील एक हजार २११ जणांना नोटीस दिल्या. डास आढळलेल्या घरगुती आणि व्यावसायिक मालमत्तांकडून आठ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. घरगुती अस्थापनांना एक हजार, व्यावसायिक अस्थापनांना दोन हजार तर मॉल, रुग्णालये, बांधकाम सुरू असलेल्या इमारत यांना दहा हजारांचा दंड आकारण्यात येतो.
हेही वाचा : राज्यातील दीड कोटी निरक्षर शोधण्याचे लक्ष्य; केंद्र सरकारचे नवभारत साक्षरता अभियान, शिक्षकांवर नवा ताण
वाढत्या शहरीकरणामुळे शहर परिसरात हवा-पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे साथीच्या रोगांनी शहरात थैमान घातले असून, गेल्या काही दिवसांत डासांमुळे पसरणाऱ्या डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सोसायट्यांबरोबरच घरातही फुलदाणी, फ्रिजच्या मागील ट्रे, कुंड्या यातून, तसेच रुग्णालये, बांधकामे, सरकारी कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी डेंग्यूचे डास आढळले आहेत. या सर्वांना नोटीस बजाविण्यात येत असल्याचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी सांगितले.
हेही वाचा : पुणे : शिवाजीनगर न्यायालयातील कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडले
‘नागरिकांनी पाणी साठवून ठेऊ नये, पाणी साठविल्यास ते झाकून ठेवावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, स्वच्छ पाण्यातच डेंग्यूचे डास अळ्यांची पैदास करतात. त्यामुळे पाणी साचणार नाही, याबाबत नागरिकांनी खबरदारी घ्यावी’, असे पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.