पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्ताच्या खंडणी विरोधी पथकाने भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा घातला. त्यात ५४६ किलो भेसळयुक्त पनीरसह चार लाख ६६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. डेअरीचे मालक साजीद मुस्तफा शेख (वय ३२ रा. पडवळनगर थेरगाव), जावेद मुस्तफा शेख (वय ३८), राकेश श्रीबुद्धराम सिंग (वय २६), अल्ताफ हजरतद्दीन शेख (वय २७), अभिषेककुमार योगेशबाबु यादव (वय २२) आणि सर्फराज शराफतउल्ला शेख (वय ३५ सर्व रा. चिंचवड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा >>> पुणे : रेल्वेचा फेरीवाल्यांना दणका
भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकाची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे पोलीस तळेगाव दाभाडे, चिंचवड पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. चिंचवड येथील महाराष्ट्र मिल्क डेअरीत भेसळयुक्त पनीर तयार केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह छापा घातला. भेसळयुक्त पनीर तयार करण्याकरीता वापरत असलेले १४० लिटर अँटीक ॲसीड, ६० लीटर आरबीडी पामोलीन तेल, २५ किलो ग्लिसरील मोनो स्टीयरेट, ८७५ किलो स्किम्ड मिल्क पावडर, ५४६ किलो भेसळयुक्त तयार पनीर असा एकूण ४ लाख ६६ हजार ५२० रुपये किंमतीचा मुद्देमाल अन्न सुरक्षा अधिकारी यांनी जप्त केला.