कोथरूडमधील सुतार दवाखान्याजवळ असलेल्या त्रिमूर्ती हाईट्स या सहामजली इमारतीत सोमवारी मध्यरात्रीनंतर ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटांमुळे लागलेल्या आगीत ४९ वाहने जळाली. इमारतीच्या तळमजल्यावरील इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या गोदामात रेफ्रिजरेटर कॉम्प्रेसरचे एकापाठोपाठ एक स्फोट झाल्याने आग वाढली आणि इमारतीतील अनेक रहिवासी अडकून पडले. अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिक रहिवासी यांच्या मदतीने सर्वाना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. या इमारतीच्या तळघरामध्ये असलेल्या ४६ दुचाकी, एक जीप आणि दोन मोटारी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या.
त्रिमूर्ती हाईट्स या इमारतीमध्ये २४ सदनिका आणि १४ दुकाने आहेत. इमारतीच्या तळमजल्याला केयूर इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान आहे, तर तळघरात या दुकानाचे गोदाम आहे. तिथे रेफ्रिजरेटर ठेवले होते. या गोदामापासून काही अंतरावरच वीज कंपनीचा ट्रान्सफॉर्मर आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. त्यामुळे तळघरात असलेले रेफ्रिजरेटर पेटले. एका पाठोपाठ एक असे रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरचे स्फोट झाले. या आवाजाने परिसरामध्ये घबराट झाली. इमारतीच्या सदनिकांमध्ये वास्तव्यास असलेले रहिवासी जागे झाले. केयूर इलेक्ट्रॉनिक्स या दुकानातील रेफ्रिजरेटर, एलसीडी, वॉशिंग मशिन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या. त्यामुळे या परिसरामध्ये प्रचंड धूर झाला. लिफ्टच्या डक्टमधून हा धूर खालून थेट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचला. रहिवाशांना या धुराचा त्रास झाला व ते जिवाच्या आकांताने मदतीची याचना करू लागले.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सात गाडय़ा, चार टँकर, ब्रँटो ही उंच शिडीची गाडी आणि एक रेस्क्यू वाहन घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यावेळी इमारतीचा सर्व भाग धुराने वेढला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले, त्याचवेळी इमारतीत अडकलेल्या रहिवाशांची सुटका करण्यास सुरुवात केली. या आगीमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ४६ दुचाकी, एक जीप आणि दोन मोटारी पूर्णपणे जळाल्या, तर एका मोटारीचे किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाले.
—चौकट—
अशी केली लोकांची सुटका
त्रिमूर्ती हाईट्स या इमारतीतील सदनिकांना गॅलरी नाही. त्यामुळे अडकलेल्या रहिवाशांची सुटका कशी करायची हा प्रश्न होता. घाबरलेल्या रहिवाशांनी टेरेसवर धाव घेतली, तर काहीजण पहिल्या मजल्यावर अडकले होते. इमारतीच्या जिन्यामध्ये प्रचंड धूर साठला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी ब्रँटोच्या साहाय्याने पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या संजय वाफगावकर यांच्या सदनिकेच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला. तेथून काही रहिवाशांना बाहेर काढण्यात आले, तर टेरेसवरील रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी ब्रँटो आणि रेस्क्यू व्हॅनचा वापर करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक मजल्यावर सदनिकेमध्ये कोणी अडकलेले नाही याची खात्री करून घेण्यात आली. अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी प्रशांत रणपिसे, केंद्रप्रमुख गजानन पाथ्रुडकर, दत्तात्रेय नागलकर, राजेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अंगद लिपाणे, दत्तात्रेय शेरे, कैलास पायगुडे, उमेश शिंदे, प्रवीण रणदिवे, बाबू शिकतल यांच्यासह ५० ते ६० जवानांनी तातडीने मदत कार्य सुरू केल्यामुळे या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही. नगरसेवक पृथ्वीराज सुतार, मुरलीधर मोहोळ, किशोर शिंदे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
.
चार महिन्यांचे बाळ सुखरूप
‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीची प्रचिती या आगीच्या दुर्घटनेमध्येही आली. मध्यरात्री दीडच्या सुमारास लागलेली ही आग साधारणपणे पहाटे साडेतीनच्या सुमारास विझविण्यामध्ये यश आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून या इमारतीतील ५५ रहिवाशांची सुटका केली. अगदी चार महिन्यांच्या तान्हुल्या बाळाला शिडीच्या साहाय्याने खाली उतरवण्यात आले आणि सगळय़ांचाच जीव भांडय़ात पडला. चार महिन्यांच्या बालकाप्रमाणेच ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकालाही धुराच्या लोटातून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. केयूर इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे मालक सचिन वीरकर यांना धक्का बसला आहे.