जगभरातील अनेक देशांत आयर्न मॅन स्पर्धा आयोजित केली जाते. ही स्पर्धा खूप कठीण असते, यामुळे सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची संख्या देखील कमी असते. तर १ डिसेंबर २०२४ रोजी आयर्न मॅन वेस्टर्न ऑस्ट्रेलिया बस्लटन येथे झालेल्या स्पर्धेत जगभरातील १७०० स्पर्धक सहभागी झाले होते, त्यापैकी ११०० जणांना ही स्पर्धा यशस्वीपणे पार करण्यात यश आले. तर या ११०० जणांमध्ये पुण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू नाथा ताम्हाणे हे देखील होते. तसेच ३.८ किमी स्विमिंग, १८० किमी सायकलिंग आणि ३२.२ किमी धावणे हे सलग १७ तासामध्ये पूर्ण करण्याचा आयोजकांचा नियम आहे. मात्र, विष्णू ताम्हाणे यांनी १५ तास ४० मिनिट आणि ४० सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. वयाच्या ५६ व्या वर्षी ही स्पर्धा जिंकल्याने विष्णू ताम्हाणे यांचं सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयर्न मॅन स्पर्धेतील अनुभवाबाबत विष्णू ताम्हाणे म्हणाले की, आई आणि वडील हे या स्पर्धेसाठी प्रेरणास्थान आहेत. वडिलांना वयाच्या ७५ व्या वर्षी पॅरेलिसिस झाला होता आणि त्यांच्या पायाचे हाडदेखील मोडले होते. माझे घर चौथ्या मजल्यावर होते आणि त्या ठिकाणी लिफ्ट नव्हती, त्यामुळे वडिलांना उपचारासाठी घेऊन जाताना खूप त्रास होत होता. हे पाहून वडिलांना पाठीवर घेऊन चौथ्या मजल्यावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मला पाठीला चमक मारली आणि मला खूप त्रास झाला. त्यानंतर वडिलांच्या सेवेसाठी स्वतः दररोज रनिंग करत राहिलो. त्या माध्यमातून माझ्यामध्ये रनिंग, सायकलिंग आणि स्विमिंग याची अधिक आवड निर्माण होती गेली. त्यानंतर कुठेही मॅरेथॉन स्पर्धा असली की सहभागी होत गेलो आणि त्यामध्ये यश मिळत राहिले. रोजच्या या चांगल्या सवयीमुळे माझ्यात खूप बदल होत गेला. हे लक्षात घेऊन समर्थ आणि मुंढवा पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असताना सायकलवर पेट्रोलिंग करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाला कर्मचारी वर्गाने चांगली साथ दिली, यामुळे अनेकांच्या आरोग्याच्या तक्रारीदेखील दूर झाल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड: “अनधिकृत गोदामांवर नंतर बोलू आधी आग विझवू”, अतिरिक्त आयुक्तांची अनधिकृत गोदामांना बगल!

तसेच ते पुढे म्हणाले की, प्रत्येक जण आपल्या क्षेत्रातील सर्वोच्च स्थानी जाण्यासाठी कष्ट घेत असतो. त्यानुसार माझं स्वप्न होतं की, आयर्न मॅन स्पर्धा जिंकायची आणि त्या दृष्टीने सरावदेखील सुरू ठेवला. मागील वर्षी आर्यन मॅन स्पर्धेत सहभागी झालो, पण अपयश आले; यामुळे मनात दुःख होतं. त्यावेळी ठरवले की, पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा जिंकायची, त्या दृष्टीने सराव सुरू केला. अनेकांचे मार्गदर्शन घेतले आणि १ डिसेंबर २०२४ रोजी होणाऱ्या आयर्न मॅन वेस्टर्न ऑस्ट्रेलिया बस्लटन स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तर या स्पर्धेत ३.८ किमी जलतरण, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी धावणे हे सलग १७ तासांमध्ये पूर्ण करणे आवश्यक असते, असा नियम आहे. या स्पर्धेत जगभरातील १७०० जण सहभागी झाले होते.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडमध्ये गोडाऊनला भीषण आग; धुरांचे लोट काही किलोमीटर..

मी आणि माझ्या सोबत तिघे जण स्पर्धेच्या चार दिवस अगोदर तिथे पोहोचलो. त्या ठिकाणी सराव केला. आपल्या येथील आणि तेथील परिस्थिती वेगळी असल्याचे सरावादरम्यान जाणवलं. पण, काही झाले तरी यंदा ही स्पर्धा जिंकायची असे मनाशी ठरवले. स्पर्धेच्या दिवशी स्विमिंग करतेवेळी ३.८ किलोमीटरचा प्रवास पार करतेवेळी लाटा मोठ्या प्रमाणावर उसळत होत्या, यामुळे प्रचंड थकवा जाणवत होता, यामुळे अधिक वेळ गेला. मात्र, सायकलिंग आणि रनिंगमध्ये वाया गेलेल्या वेळेची बचत केली. अखेर १५ तास ४० मिनिट आणि ४० सेकंदात आयर्न मॅन जिंकण्यात यश आले, यामुळे खूप आनंदी आणि समाधानी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 56 year old pune police officer vishnu tamhane won ironman competition in australia svk 88 zws