नगर पथ विक्रेता समिती (फेरीवाला समिती) निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. निवडणुकीत ५८ टक्के मतदान झाल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, निवडणुकीसाठीची मतमोजणी सोमवार, ५ डिसेंबर रोजी राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे होणार आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार कामगार विभागातील सक्षम प्राधिकारी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका कार्यक्षेत्रासाठी पथ विक्रेता समितीमधील सदस्यांसाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान झाले.
मतदानासाठी महापालिकेने एकूण ३२ केंद्र निश्चित केले होते. निवडणुकीमध्ये एकूण ११ हजार ९०९ पथ विक्रेता मतदारांपैकी ६ हजार ८७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यामध्ये ४ हजार ९६३ पुरूष मतदार तर १ हजार ९१६ स्त्री मतदार होते, अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा- अपंगांना स्वावलंबी बनवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेची कौशल्य प्रशिक्षण योजना
निवडणूक प्रक्रियेसाठी महापालिकेकडील विविध विभागातील सुमारे ४८० अधिकारी आणि कर्मचारी, पोलीस यंत्रणा, तसेच अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाकडील आठ कर्मचारी सहभागी झाले होते. निवडणुकीसाठीची मतमोजणी सोमवारी होणार असून मतमोजणी केंद्रात फक्त निवडणुकीचे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे.