पुणे : राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आठ झाली आहे. दरम्यान, राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या २०३ वर पोहोचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील खासगी रुग्णालयात ५९ वर्षीय पुरुषाचा जीबीएसने मंगळवारी (ता.११) रात्री मृत्यू झाला. तो खडकवासल्यातील संत रोहिदास नगरमधील रहिवासी होता. या रुग्णाला १० फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना अशक्तपणा जाणवत होता आणि हालचालही करता येत नव्हती. त्यांची नर्व्ह कंडक्शन व्हेलोसिटी चाचणी करण्यात आली होती. त्यात जीबीएसचे निदान झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. आतापर्यंत जीबीएसमुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू सोलापूरमध्ये झाला. हा रुग्ण पुण्यातून सोलापूरला गेला होता. त्यानंतर पुण्यात ६ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यात जीबीएसचे आतापर्यंत २०३ रुग्ण आढळून आले असून, त्यातील १७६ रुग्णांचे जीबीएस निदान झाले आहे. पुण्यातील जीबीएस रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, पुणे महापालिका ४१, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावे ९४, पिंपरी-चिंचवड महापालिका २९, पुणे ग्रामीण ३१ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात इतर जिल्ह्यांत आतापर्यंत ८ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ५२ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याचबरोबर २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यभरात १०९ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

वयोगटनिहाय जीबीएस रुग्णसंख्या

वयोगट – रुग्ण

० ते ९ – २४

१० ते १९ – २४

२० ते २९ – ४४

३० ते ३९ – २४

४० ते ४९ – २७

५० ते ५९ – २९

६० ते ६९ – २१

७० ते ७९ – ६

८० ते ८९ – ४

एकूण – २०३