पुणे : एरंडवणे परिसरातील एका गर्भवतीला झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या पाचवर गेली आहे. रुग्ण आढळून आलेल्या एरंडवणे आणि मुंढवा परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे.
एरंडवण्यातील गणेशनगर परिसरातील गर्भवतीला झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. संसर्ग झालेल्या गर्भवतीची मे महिन्यात सोनोग्राफी चाचणी करण्यात आली होती. त्या अहवालात झिकाचा काहीही परिणाम दिसून आलेला नाही. या महिलेची प्रकृती स्थिर आहे. तिच्यामध्ये झिकाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा >>> लोणावळा: ‘त्या’ धबधब्याच्या प्रवाहातून १० पैकी पाच जण सुखरूप वाचले, वाहून गेलेल्या ५ जणांपैकी तिघांचा मृत्यू
एरंडवणे परिसरात आधी झिकाचे दोन रुग्ण आढळले होते. त्यात ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या १५ वर्षीय मुलीचा समावेश होता. आता या परिसरात एका गर्भवतीला संसर्ग झाला आहे. याचबरोबर मुंढव्यात ४७ वर्षीय महिला आणि तिचा २२ वर्षीय मुलगा यांना झिकाचा संसर्ग झाला आहे. यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या पाचवर गेली आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेले आणि तापाची लक्षणे असलेले त्यांचे कुटुंबीय आणि इतर व्यक्तींचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत.
हेही वाचा >>> पालखी सोहळ्यात शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी गजर, काय आहे नियोजन ?
प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर
झिकाचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. एरंडवणे आणि मुंढव्यात रुग्ण आढळलेल्या परिसरात प्रत्येकी १०० घरांच्या आतमध्ये धूर फवारणी करण्यात आली आहे. कारण झिकाचे डास घरांच्या आतमध्येही आढळून येतात. याचबरोबर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांची डासोत्पत्ती स्थाने शोधून नष्ट केली जात आहेत. तसेच, या प्रकरणी इमारतमालकांना नोटिसाही बजावल्या जात आहेत, असे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी सांगितले.