पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४३ जणांची पाच कोटी ९६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाला हडपसर पोलिसांनी अटक केली.प्रतीक कुमार चौखंडे (वय ३६, रा. स्वप्नलोक सोसायटी,  फुरसुंगी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. चौखंडे हा हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात शेअर बाजार गुंतवणूक मार्गदर्शन वर्ग चालवायचा. शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून चौखंडेने एका तक्रारदाराकडून २५ लाख रुपये घेतले. सुरवातीला त्याला परतावा दिला. मात्र, गेल्या महिन्यापासून त्याने परतावा देणे बंद केले. तक्रारादारने चैाखंडेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. चौकशीत त्याने तक्रारदारासह ४३ जणांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

त्यानंतर तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली.  पोलिसांनी चौखंडे याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त आश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे आणि तपास पथकाने चौखंडे याला अटक केली. चौखंडेला तपासासाठी अर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा >>>दिल्ली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डाॅ. तारा भवाळकर यांची निवड

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. शेअर बाजराात गुंतवणूक मार्गदर्शन वर्ग चालविले जातात. गुंत‌वणुकीच्या आमिषाने यापूर्वी फसवणूक करण्याच्या घटना घडल्या आहेत. मध्यंतरी निवृत्त जवानाने गुंत‌वणुकीच्या आमिषाने घोरपडी परिसरातील अनेकांची फसवणूक केली होती.