पुणे : पुणे विमानतळावरील विमानसेवेला सलग पाचव्या दिवशी गुरूवारी फटका बसला. पुणे विमानतळावरून जाणारी सहा आणि येणारी सहा विमाने रद्द करण्यात आली. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. याचबरोबर विमानतळावरील सेवेतील गोंधळामुळे प्रवाशांच्या गैरसोयीत आणखी भर पडली.
हेही वाचा >>> मोठी बातमी : राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
पुणे विमानतळावर गुरूवारी एकूण १२ विमाने रद्द झाली. त्यात चंडीगड, हैदराबाद, गुवाहाटी, चेन्नई, गोवा आणि बंगळुरूतून येणारी ६ विमाने रद्द झाली. तसेच, चंडीगड, हैदराबाद, गुवाहाटी, चेन्नई, गोवा आणि बंगळुरूला जाणारी विमाने रद्द झाली. पुणे विमानतळ प्रशासनाने १२ विमाने रद्द झाल्याला दुजोरा दिला असला तरी नेमक्या कोणत्या कारणामुळे ही विमाने रद्द झाली याबद्दल माहिती दिलेली नाही. याचवेळी विमानतळावरील चुकीच्या नियोजनाचाही प्रवाशांना फटका बसत आहे. चेक-इन करण्यासाठी एका तासाहून अधिक काळ रांगेत उभे राहावे लागत असल्याचा अनुभव अनेक प्रवाशांनी सांगितला.
हेही वाचा >>> मनोज जरांगे यांची पदयात्रा बुधवारी पिंपरी-चिंचवडमध्ये; ‘असे’ होणार स्वागत
देशात उत्तरेतील राज्यांतील धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने १३ जानेवारीपासून विमाने रद्द होण्याचे प्रमाण वाढले होते. अनेक विमानांना पाच ते सहा तासांहून अधिक विलंब होत आहे. खराब हवामानाचा विमानसेवेला फटका बसत आहे. विमाने रद्द होण्याचे प्रमाण कायम आहे. यामुळे प्रवाशांच्या प्रवास नियोजनावर पाणी फेरले जात आहे.
इंडिगोच्या प्रवाशांना सर्वाधिक फटका उत्तरेतील राज्यांतील धुक्यामुळे मागील काही दिवस विमाने रद्द होत असली तरी त्याचा सर्वाधिक फटका इंडिगोच्या प्रवाशांना बसत आहे. मागील काही दिवसांत रद्द होणाऱ्या विमानांपैकी बहुतांश इंडिगोची आहेत. पुणे विमानतळावरील गुरूवारी रद्द झालेल्या १२ विमानांपैकी १० विमाने इंडिगोची होती.