चिंचवड रेल्वे स्टेशनलगत उद्योगनगर येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामाचा पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळून सहा कामगार जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. स्लॅबच्या राडारोडय़ाखाली अडकलेल्या कामगारांना अग्निशामक दल व नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा बंगला एका आमदारासाठी बांधण्यात येत असल्याचे वृत्त आहे. विकास पाटील (वय २५, रा. पिंपळे निलख), अर्शद शेख (वय १८), कृपाल यादव (वय ४५), शरीफ वलिदा (वय १८), व्यंकटेश कांबळे (वय ५०, सर्व राहणार, चिंचवड) आणि गोपाळ वर्मा (वय ३९, रा. पिंपळे सौदागर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी निगडी व चिंचवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योगनगर येथे एका इमारतीच्या पहिल्या मजल्याचे स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. दुपारी अडीचच्या सुमारास काम सुरू असताना अचानक स्लॅब खाली कोसळला. यावेळी पंधरा ते सोळा जण काम करत होते. कोसळलेल्या स्लॅबखाली काहीजण अडकले होते. अग्निशामक दलाला कळवताच जवानांनी अडकलेल्या सहाजणांना बाहेर काढले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही, असे पोलीस उपनिरीक्षक माने यांनी सांगितले.
दरम्यान, बांधकाम विभागाचे प्रमुख वसंत काची यांनी हे बांधकाम अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले. स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता मकरंद निकम दूरध्वनीला प्रतिसाद देत नव्हते. पवन वाधवानी यांचे बांधकाम असून बोरकर विकसक असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. औद्योगिक भूखंडांचे निवासीकरण या योजनेतून हे बांधकाम होत होते. तथापि, कामगार आयुक्तांची त्यास परवानगी मिळालेली नाही. महापालिकेकडे या बांधकामासंदर्भात कोणताही प्रस्ताव आलेला नाही, मोजणी नकाशाही नाही, असे या विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader